आयपीएल संघ परदेशी संघांसोबत खेळणार मैत्रीपूर्ण लढती – जय शहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही क्रिकेटविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली टी-20 क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएलची व्याप्ती वाढविण्याचा आमचा मानस असून आयपीएल संघ परदेशी संघांसोबत मैत्रीपूर्ण लढती खेळण्यासाठी एक योजना बनवली जात आहे. ‘आयसीसी’कडेही आयपीएलसाठी अडीच महिन्यांची विंडो मागण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिली.

जय शहा म्हणाले, आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन नवे संघ सहभागी झाल्याने ही 10 संघांची स्पर्धा दोन महिने चालली. दरम्यान, आयसीसीच्या काही द्विपक्षीय स्पर्धा असल्याने परदेशी खेळाडूंसाठी आयपीएल फ्रेंचाईजींना थोडा अडचणींचा सामना करावा लागला. काही परदेशी खेळाडू उशिरा संघात दाखल झाले, काहींना आपल्या राष्ट्रीय संघासाठी आयपीएलवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे ‘आयसीसी’कडून आयपीएलसाठी अडीच महिन्यांची विंडो घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शहा यांनी सांगितले. आयपीएल संघांना परदेशात सामने खेळण्यासाठी परदेशी संघांसोबत चर्चा सुरू आहे. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.