इराणमध्ये अडकलेले पश्चिम महाराष्ट्रातील 44 नागरिक मायदेशी परतले

1121
प्रातिनिधिक फोटो

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 44 नागरिक शनिवारी रात्री उशिरा मायदेशी परतले. त्यांना हिंदुस्तानात सुखरूप परत आणण्यासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान ‘त्या’ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्राथमिक तपासणीतून स्पष्ट झाले असून सुरक्षिततेच्या कारणावरून त्यांना राजस्थान येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील 44 उमराह (हज) यात्रेकरू 21 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्रातून इराकसाठी निघाले होते. त्यांचे विमान 21 फेब्रुवारी 2020 रोजी इराणची राजधानीत तेहरान शहरामध्ये दाखल झाले. मात्र, पुढील विमानसेवा रद्द झाल्यामुळे सदर 44 यात्रेकरू इराणमध्ये अडकले होते. त्यांच्याबरोबर साद ट्रॅव्हल्स, कोल्हापूरचे एस. एस. मोमीन हे सुध्दा होते. मोमीन यांनी साताराच्या सामाजिक कार्यकर्ता अंजली कुलकर्णी यांच्यामार्फत खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून, आम्हाला इराणमधून सुखरूप मायदेशी परत आणण्याची विनंती केली होती. श्रीनिवास पाटील यांनी लोकांना परत मायदेशात आणण्यासाठी जलद हालचाली सुरु केल्या. त्यांनी ई-मेलद्वारे परराष्ट्र मंत्रालयाला पत्र दिले. तसेच दि. 2 मार्च रोजी पाटील यांनी हज यात्रेकरूंना मदत करावी, असे लेखी पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून त्याविषयी विनंती केली होती.

इराणमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्यांना विमानाद्वारे हिंदुस्थानात आणण्यात आले. शनिवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. विमानातील सर्व प्रवाशांना राजस्थान मधील जैसलमेर येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असून कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रीनिवास पाटील यांचे मानणार आभार
खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ते 44 नागरिक सुखरूप परतले असून त्यांनी पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. तर 14 दिवसानंतर गावी आल्यानंतर समक्ष भेटून पाटील यांचे आभार मानणार असल्याचे मोमीन यांनी फोनवरून सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या