जर तुम्ही हा व्हिडीओ पाहत असाल, तर मी आता या जगात नाही! 10 मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत इराणी तरुणानं जीवन संपवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर लष्करी कारवाईला सुरुवात करण्याची शक्यता आहे. आखाती देशांमध्ये युद्धाचे सावट घोंघावत असतानाच आता इराणमधील एका तरुणाने व्हिडीओ करत मृत्युला कवटाळले आहे. पुरिया हमिदी असे या तरुणाचे नाव असून मृत्युपूर्वी त्याने 10 मिनिटांचा अस्खलित इंग्रजी भाषेतील व्हिडीओ रेकॉर्ड केला.

इराणमधील बुशेहर या दक्षिण बंदर शहरात राहणाऱ्या हमिदी याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाश्चात्य देशांना इराणच्या सत्ताधारी राजवटीशी कोणताही राजनैतिक करार न करण्याची विनंती करणारा व्हिडीओ शेअर केला आणि जीवन संपवले. इराणमधील आंदोलकांवर होणाऱ्या जीवघेण्या कारवाईकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्याचा आणि इराणच्या नेतृत्वाविरुद्ध परकीय हस्तक्षेपाची मागणी करण्याचा प्रयत्न त्याने केला. ‘इराण इंटरनॅशनल’ या विरोधी पक्षांशी संबंधित माध्यमांनी ही माहिती दिली आहे. याबाबत ‘इंडिया टूडे‘ने वृत्त दिले आहे.

जर तुम्ही हे पाहत असाल, तर मी आता या जगात नाही, असे व्हिडीओच्या सुरुवातीलाच हमिदी म्हणतो. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान निर्दयीपणे कत्तल करण्यात आली. यात 40 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. ही संख्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धातील मृतांपेक्षा जास्त आहे, असेही तो यात म्हणतो.

हमिदी याने नमूद केले की, इराणी जनता बंदुका घेतलेल्या लोकांशी लढू शकत नाही. सध्या अमेरिकेने इराणवर हल्ला करणे हीच आमची एकमेव आशा आहे. आम्ही एकटे या राजवटीशी लढू शकत नाही. आमच्या लोकांना परकीय हस्तक्षेपाची गरज आहे. यावेळी त्याने इराणी लोकांच्या हतबलतेचेही वर्णन केले. लोकांना किती आशाहीन वाटते आहे हे तुम्हाला माहीत नाही. मला स्वतःला जेवण जात नाहीये, झोप येत नाहीये. अशा ठिकाणी जन्माला येणे जिथे भविष्य नाही, हे इतके हास्यास्पद आहे की मला रडूही येत नाही, असे तो म्हणाला.

इराणच्या युरेनियमवर तुर्की आणि रशियाची नजर; आज अमेरिकेचे राजदूत इराणच्या विदेश मंत्र्यांना भेटणार

इराणमध्ये खामेनी यांच्या सरकारविरोधात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. लाखो लोक रस्त्यावर उतरल्याने सरकारची कोंडी झाली. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस, सैन्यबळाचा वापर करण्यात आला. यात महिला, लहान मुलांसह हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला लष्करी कारवाईची धमकी दिली. याला इराणनेही प्रत्युत्तर दिले आणि अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.

अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, दूतावासाकडून स्पष्ट सूचना; फोन चार्ज करण्याचेही आवाहन