
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या हल्ल्याच्या धमकीला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्हाला युद्ध नको आहे, मात्र हल्ला झाल्यास अमेरिकेचे आखातातील सगळे तळ उडवून देणार, असा जाहीर इशारा इराणने दिला आहे.’ इराणने संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँण्टोनियो गुटेरस यांना खुले पत्रच लिहिले आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये सध्या अण्वस्त्र बंदी करारावर बोलणी सुरू आहेत. वाटाघाटी सुरू असताना दुसऱ्या बाजूला अमेरिका लष्करी हालचाली करून इराणवर दबाव वाढवत आहे. अलीकडेच अमेरिकेने लढाऊ विमाने आणि जहाजे इराणच्या दिशेने रवाना केली आहेत. त्यानंतर आता ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम दिला आहे. अमेरिकेसोबत अण्वस्त्र करार करण्यासाठी आता इराणकडे फक्त 15 दिवसांचा वेळ आहे. त्या मुदतीत करार झाला नाही तर अनर्थ ओढवेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले आहे.
युनोला सहा पत्रे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या धमक्यांबद्दल इराणने चिंता व्यक्त केली आहे. इराणने याआधी युनोला सहा पत्रे लिहिली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने याची गंभीर आणि तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन इराणने केले आहे.

























































