युद्धाचा भडका! अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा, व्हाईट हाऊसकडून वृत्ताचे खंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशातील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) बुधवारी अमेरिकेचे अत्याधुनिक ‘F-18’ फायटर जेट यशस्वीरित्या पाडल्याचा खळबळजनक दावा केला. इराणच्या सरकारी वाहिनीने यासंदर्भातील एक व्हिडिओही प्रसिद्ध केला असून, चाबहार क्षेत्रात नव्या एअर डिफेन्स सिस्टमद्वारे ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने इराणचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने दिलेला युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने अधिकृतपणे फेटाळून लावला आहे. चर्चेद्वारे मार्ग काढण्याऐवजी इराणने इस्रायल आणि आखाती देशांवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायलने यापूर्वी तेहरानवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराण आक्रमक पावले उचलत असल्याचे दिसत आहे. यामुळे या संपूर्ण प्रदेशात लष्करी हालचालींना वेग आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा कडक इशारा
इराणच्या या भूमिकेनंतर व्हाईट हाऊसने अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला आहे. प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. जर इराणने आपली आक्रमकता थांबवली नाही, तर अमेरिकेकडून मोठा लष्करी प्रहार केला जाईल. चर्चेला यश आले नाही, तर इराणला अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

 अमेरिकेकडून अतिरिक्त सैन्य तैनात
युद्धाचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेने मध्य पूर्वेत आपली लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, ’82nd एअरबॉर्न डिव्हिजन’चे सुमारे 1000 सैनिक लवकरच या भागात तैनात केले जाणार आहेत. याव्यतिरिक्त 5000 मरीन सैनिक आणि हजारो नौसैनिक देखील युद्धभूमीच्या दिशेने रवाना होत आहेत.