
मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे युद्ध केवळ त्या देशांपुरते मर्यादित नसून त्याची मोठी किंमत हिंदुस्थानलाही चुकवावी लागेल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. या युद्धामुळे हिंदुस्थानात इंधन महाग होईल आणि देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “हे युद्ध वरवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात दिसत असले, तरी प्रत्यक्षात ही अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील व्यापारी आणि धोरणात्मक वर्चस्वाची स्पर्धा आहे. अमेरिका आपले जागतिक महासत्तापद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे चीन सातत्याने प्रगती करत हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.”
On the surface, it appears to be a war involving the United States, Israel, and Iran. In reality, it reflects a larger strategic contest between the United States, China and Russia.
The United States is trying to preserve its position as the dominant global power, while China is… pic.twitter.com/Pepumecbxc
— Congress (@INCIndia) March 6, 2026
मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामावर राहुल गांधी यांनी भाष्य केले. “मध्यपूर्व हे जगातील ऊर्जा उत्पादनाचे सर्वात मोठे केंद्र आहे. आता या पुरवठा साखळीवर दबाव निर्माण केला जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. तेथील तणाव वाढल्यास त्याचे परिणाम या क्षेत्राच्या पलीकडे दूरवर जाणवतील.”
“जेव्हा या जागतिक शक्ती आपापसात लढतात, तेव्हा इतर देशांनाही त्याची किंमत मोजावी लागते. विशेषतः हिंदुस्थानवर याचा सर्वाधिक परिणाम होईल. कारण हिंदुस्थान आपल्या ऊर्जा गरजांसाठी (कच्चे तेल आणि गॅस) मध्य पूर्वेतील देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे”, अशी चिंता राहुल गांधी यांनी व्यक्त केली.



























































