हिजाबविरोधात रस्त्यावर उतरल्या महिला, हिजाब काढून फेकले रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण या मुस्लीम बहुल देशात महिलांवर हिजाब घालण्याची सक्ती आहे. मात्र आता सरकारची ही सक्ती मोडून काढण्यासाठी अनेक महिला पुढे येत आहेत. मंगळवारी इराणमध्ये मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरल्या होत्या व त्यांनी हिजाबचा कडाडून विरोध केला आहे.

 

मंगळवारी इराण सरकारने ‘हिजाब व शुद्धता’ असा एक दिवस साजरा करणार असल्याचे घोषित केले होते. त्याविरोधात देशभरातील महिला पुढे आल्या असून त्यांनी भररस्त्यात त्यांचे हिजाब उतरवत त्यांचे व्हिडीओ काढले आहेत. हे व्हिडीओ या महिलांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हिजाबविरोधात एक चळवळ सुरू केली आहे. महिलांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या त्यांच्या अंगावरील शाल, स्कार्फ, हिजाब रस्त्यावर फेकताना दिसत आहेत. तसेच काही व्हिडीओमध्ये महिला या हिजाबशिवाय प्रवास करताना, सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. हिजाबच्या या आंदोलनाला रोखण्यासाठी इराण सरकारने सैनिकांना हे आंदोलन मोडून काढण्याचे आदेश दिले आहेत. हे आंदोलन करणाऱ्या महिलांना सैनिक व पोलीस अटक करत असल्याचे देखील समोर आले आहे.

इराण सरकारने मंगळवारी हिजाब व शुद्धता दिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या महिलांनी सफेद रंगाचा लांब झगा व त्यावर हिरव्या रंगाचा मोठा हिजाब घातला होता. त्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला. मात्र त्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.