
सामना ऑनलाईन । पुणे
पुण्यात एका 30 वर्षीय इराणी तरुणीला घरात कोंडून मारहाण केल्याचा आणि सिगारेटचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उद्योगपतीच्या मुलाला अटक केली आहे. धनराज मोरारजी (47) असे या उद्योगपतीच्या मुलाचे नाव आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, इराणमधील तेहरान येथे राहणारी परवीन घेलिची ही तरुणी याच वर्षी मे महिन्यात सॉफ्टवेअर क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये तिच्या एका मैत्रिणीने तिची धनराज मोरारजी याच्याशी ओळख करून दिली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. धनराजने तिला मी तुझा खर्च करेल आणि तुझी काळजी घेईल असे आश्वासन दिले. त्यानंतर दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. परंतु याच प्रेमसंबंधांमुळे तिला त्रास सहन करावा लागला. धनराजने जवळपास 2 महिने परवीनला घरात कोंडून ठेवले, तिचा छळ केला. सिगारेटचे चटकेही दिले. अखेर तिने धाडस दाखवत इन्स्टाग्रामवरुन मैत्रिणीला मेसेज केला आणि सोमवारी परवीनची सुटका झाली.
नव्याचे नऊ दिवस
धनराजसोबत मैत्री झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्याने परवीनला चांगली वागणूक दिली. परंतु त्यानंतर किरकोळ कारणाने तो तिच्यासोबत भांडण, मारहाण करू लागला. धनराजने एकदा माझ्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली, असे परवीनने तक्रारीत म्हटले आहे. तसेच तो मला कोणाशीही बोलू देत नव्हता, माझ्या मोबाईलवरील कॉल आणि मेसेजकडे त्याचे लक्ष असायचे, मी माझ्या आईशी काय बोलायचे हे देखील तो वाचायचा. यासाठी तो गुगल ट्रान्सलेटरचा वापर करायचा, असे परवीनने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर धनराजने मला सिगारेटचे चटकेही दिले, असे परवीनने पोलिसांना सांगितले. दरम्यान धनराजवर मारहाण करणे, धमकी देणे, डांबून ठेवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































