
सामना प्रतिनिधी, मुंबई
कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची सुविधा येत्या 26 जानेवारीपासून मिळणार आहे.
साईबाबांच्या दर्शनाला जाताना रांगांचा सामना भक्तांना करावा लागतो. त्यामुळे आता शिर्डीला जाताना दर्शनाचेही तिकीट आगाऊ बुक केल्याने भक्तांचा वेळ वाचणार आहे. रेल्वेची उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसीच्या वेबसाइट www.irctc.co.in या वर रेल्वेच्या तिकिटासोबत दर्शनाचे आरक्षण करता येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ‘पीएनआर’ नंबरसह बुक झालेल्या रेल्वे तिकीटधारकांनाच ही सुविधा मिळणार आहे. श्री साई संस्थानबरोबर आयआरसीटीसीने यासाठी करार केला आहे.


























































