
रक्तक्षय होऊ नये म्हणून आदिवासी मुले तसेच मातांना देण्यात येणाऱ्या आयर्न ऍण्ड फॉलिक ऑसिड गोळ्यांचा साठा भातसा कालव्यामध्ये फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका दक्ष नागरिकाने याबाबतचा भंडाफोड केला असून त्याची खबर ना आरोग्य विभागाला ना पोलिसांना होती. या गोळ्या कोणी व का फेकल्या याचे गूढ निर्माण झाले असून आदिवासी मुले आणि मातांची ‘शक्ती’च जणूकाही या कालव्यात वाहून गेली आहे.
शहापूरहून सावरोली गावाकडे जाणाऱया रस्त्यावर भातसा कालवा आहे. या कालव्यामध्ये औषधांची पाकिटे असल्याचे एका दक्ष नागरिकाच्या लक्षात आले. या पाकिटांवर ‘नॉट फॉर सेल’ असे छापले आहे. शहापूर तालुक्यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून गर्भवती तसेच स्तनदा मातांना या गोळ्या देण्यात येतात. आश्रमशाळा व अन्य शाळांमधील 14 वर्षांखालील मुलांनादेखील आठवडय़ातून एकदा आयर्न ऍण्ड फॉलिक ऑसिडच्या गोळ्या देतात. या गोळ्यांची पाकिटे भातसा कालव्याच्या ठिकाणी आढळून आल्याने विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
या गोळ्या शक्तिवर्धक असून भातसा कालव्यामध्ये त्याची पाकिटे टाकण्याचे कारण काय, असाही सवाल विचारला जात आहे. खासगी डॉक्टरांना एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) काही गोळ्यांचे सॅम्पल देतात. त्यावरदेखील ‘नॉट फॉर सेल’ असे लिहिलेले असते. त्यामुळे गोळ्या फेकण्याचे कृत्य नेमके कोणी केले याचा शोध पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाने घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
संशयाची सुई आरोग्य विभागाकडे
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आयर्न ऍण्ड फॉलिक ऑसिडच्या गोळ्या शहापूर तालुक्यातील स्तनदा माता तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामुळे संशयाची सुई आरोग्य विभागाकडे गेली आहे. आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी नेमके बघतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.






























































