अंधेरीत पुलाचा लोखंडी रॉड निखळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी पुलाचा अपघात ताजा असतानाच याच पुलाजवळील पाइपलाइन जाण्यासाठी टाकलेल्या पुलाचा रॉड गंजून निसटल्याचे वेळीच निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. हा तुटलेला लोखंडी तुकटा हटविण्यासाठी पॉवर ब्लॉक घेतल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपारी अर्धा तास विस्कळीत झाली.

अंधेरी गोखले पुलाचा पादचारी मार्ग कोसळल्याने एख जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना ३ जुलै रोजी घडली होती. याच पुलाजवळ पाइपलाइन टाकण्याची बांधण्यात आलेल्या पुलाचा लोखंडी रॉड अचानक निखळून लटकत असल्याचे वेळीच निदर्शनास आल्याने जलद मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात आला. त्यासाठी अप आणि डाऊन जलद मार्गाची वाहतूक दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थांबविण्यात आली. दुपारी १२.२५ ते १२.३६ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक घेऊन हा लटकणारा तुकडा हटविण्यात आला. या काळात अप जलद मार्गाची वाहतूक गोरेगाव तर डाऊन जलद मार्गाची वाहतूक सांताक्रुझपासून वळविण्यात आली. यामुळे दोन अप जलद लोकल रखडल्या. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.