
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इरफान खान याच्यावर लंडन येथे कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. एकीकडे तो लवकर बरा व्हावा, यासाठी जगभरातील त्याचे चाहते प्रार्थना करीत आहेत. दुसरीकडे इरफानने मात्र आजारापुढे हात टेकल्याचा हताशपणा व्यक्त केला आहे. आयुष्यात अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टी मिळतातच असे नाही. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे कॅन्सर झाल्यावर मला कळले. आता सगळी शस्त्रे टाकून मी आयुष्यापुढे शरणागती पत्करलेय. आता मी चिंता करणे सोडून दिलेय… गोष्टींच्या मागे पळणे सोडून दिलेय, अशी हतबलता इरफानने व्यक्त केली.
इरफानने चाहत्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यात आपल्यावर सुरू असलेले उपचार, तणाव आणि वेदना याबाबत इरफानने आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. इरफान म्हणतो, ‘न्यूरोएन्डोक्राइन ट्युमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी माहितीच कमी उपलब्ध असल्याने उपचाराबाबतही प्रश्नचिन्ह होते. उपचाराची चाचणी जणू काही माझ्यावरच केली जात होती. त्याची काहीच शाश्वती नव्हती. या खेळाचा मी एक भाग होतो. खूप अपेक्षा, स्वप्न, इच्छा, ध्येय घेऊन तुम्ही एखाद्या प्रवासाला निघता आणि इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच तुम्हाला गाडीतून उतरण्यास सांगितलं जावं, तसंच काहीसं माझ्यासोबत घडलंय. भय आणि अस्वस्थतेनं माझ्यावर जिंकू नये इतकीच माफक अपेक्षा माझी आहे.’
‘मला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त तीव्र वेदना जाणवतात. संपूर्ण विश्व त्या क्षणी एक होतं आणि फक्त एकच गोष्ट तीव्रतेने जाणवत असते, ती म्हणजे वेदना. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं, इतकंच काय ते आता माझ्या हातात राहिलं आहे,’ असे इरफानने लिहिलेय.
‘या संपूर्ण प्रवासात, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यांच्या प्रार्थनांमुळे मला बळ मिळू लागले. महासागरातील पाण्यांच्या लाटांवर हेलकावे घेणाऱ्या एखाद्या छोट्याशा किंवा सामान्य वस्तूमध्ये त्या लाटांना नियंत्रित करण्याची शक्ती नसते किंबहुना त्या लाटांना नियंत्रणात आणण्याचा अर्थहीन प्रयत्न त्याने करूच नये. फक्त निसर्गाच्या त्या शक्तीपुढे स्वत:ला त्याने झोकून द्यावं आणि त्याचा आनंद लुटावा.’
तुम्ही एखाद्या प्रवासाला निघता आणि इच्छित स्थळी पोचण्यापूर्वीच तुम्हाला गाडीतून उतरण्यास सांगितलं जावं, तसंच काहीसं माझ्यासोबत घडलंय.
























































