
कोरोना महामारीच्या काळात अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले. 2020 हे वर्ष तर बॉलिवूडसाठी एका दु:खद स्वप्नासारखेच राहिले. सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूरसह इरफान खान यानेही गेल्या वर्षी अकाली एक्झिट घेतली.
इरफान खान याला कर्करोग झाला होता. अमेरिकेत त्याने उपचारही घेतले होते. मात्र 29 एप्रिल, 2020 ला तो सर्वांना सोडून देवाघरी गेला. उद्या (29 एप्रिल) इरफान खान याचे पहिले वर्षश्राद्ध आहे. यानिमित्ताने इरफान खान यांचा मुलगा बाबिल याने वडिलांच्या अनेक आठवणी ताज्या केल्या आहेत.
बाबिल खान याने वडील इरफान खान यांच्या आठवणी ताज्या केल्या असून चाहतेही भावूक झाले आहेत. वडिलांच्या निधनाच्या दोन-तीन दिवस आपण रुग्णालयात गेलो होतो, तेव्हा त्यांना शुद्धही नव्हती. वडिलांचे अखेरचे शब्द ‘मी लवकरच मरणार आहे’, होते, असे बाबिल याने सांगितले.
मी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे हसून पाहिले आणि मी मरणार आहे, असे म्हटले. त्यांचे मन हेलावून टाकणारे शब्द ऐकूण मी स्तंभित झालो आणि स्वत:ला सावरत तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही असे म्हटले. माझे शब्द ऐकूण वडील फक्त हसले आणि पुन्हा त्यांची शुद्ध हरपली.
दरम्यान, इरफान यांनी ‘हासील’, ‘मकबूल’, ‘पानसिंह तोमर’, ‘द लंच बॉक्स’, ‘सलाम बॉम्बे’, ‘हैदर’, ‘हिंदी मीडियम’, अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये कसदार अभिनय साकारला. फेब्रुवारीमध्ये आलेला ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित सिनेमा ठरला.


























































