शिवसेनेची आज ‘भारती ऍक्सा’वर धडक! उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणार ‘इशारा मोर्चा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल, असा इशारा देण्यासाठी उद्या बुधवारी शिवसेना मुंबईत प्रचंड मोर्चा काढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘भारती ऍक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे. त्यात शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यासाठी शिवसेना गावागावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी अक्षरशः जिवाचे रान करत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक थेट शेताच्या बांधावर पोहोचले असून त्यांना लागेल ती मदत करत आहेत.

पीक विम्याच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही त्यांना त्यांच्या हक्काचे विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. या कंपन्यांना शिवसेना आपल्या स्टाइलने या इशारा मोर्चाच्या माध्यमातून जाब विचारणार आहे. मुंबईतील मोर्चा हा प्रतीकात्मक मोर्चा असेल.राज्यभरातील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्येही शिवसेनेची शिष्टमंडळे जातील, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते-आमदार ऍड. अनिल परब यांनी दिली.

असा निघणार मोर्चा

  • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉटजवळून सकाळी ठीक
    11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.
  • बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँकच्या इमारतीसमोरील मार्गाने हा मोर्चा पुढे जाईल.
  • जियो वर्ल्ड कंपनीच्या इमारतीला वळसा घेऊन ‘परिणी’ या इमारतीसमोर मोर्चा थांबेल.
  • परिणी इमारतीच्या 19 व्या मजल्यावर ‘भारती ऍक्सा’ कंपनीचे कार्यालय आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ त्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक विम्याच्या पैशांबाबत जाब विचारेल.