
इस्रायल-हमासचे रक्तरंजित युद्ध पाचव्या दिवशीही सुरूच असून दोन्ही बाजूकडून रॉकेट्स, बॉम्ब डागणे सुरूच आहे. रस्तोरस्ती इस्रायलचे सैनिक आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. सातत्याने बॉम्बवर्षाव केल्यामुळे संपूर्ण गाझा पट्टी अंधाराखाली असून आपत्कालीन वीजही दोनच दिवस पुरेल अशी स्थिती आहे. या युद्धात 3 हजार 900 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलने गाझापट्टीत फॉस्फरस बॉम्ब डागले. इंधन संपल्यामुळे येथील वीज यंत्रणाच ठप्प झाल्याचे पॅलेस्टाईनच्या ऊर्जा प्राधिकरणाचे अध्यक्ष थापर मेल्हेम यांनी व्हॉईस ऑफ पॅलेस्टाईन रेडिओला सांगितले.
फॉस्फरस बॉम्बमुळे काय होणार?
इस्रायलने बंदी असलेला फॉस्फरस बॉम्ब डागल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला असून पॅलेस्टाईनची न्यूज एजन्सी वाफाने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, हा बॉम्ब पडल्यानंतर संबंधित परिसरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. या बॉम्बमध्ये असलेले सूक्ष्म कण शरीरात घुसतात आणि प्रचंड वेदना होऊन तत्काळ मृत्यू होऊ शकतो.
इस्रायलने आज बुधवारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर युनिटी सरकार स्थापन केले असून यात विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असणार आहेत. युद्धासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचा नेतान्याहू यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. युनिटी सरकारची वॉर पॅबिनेट असते. ही कॅबिनेट युद्धाच्या रणनीतीबाबत सर्व निर्णय घेते.
इस्रायलमधील हिंदुस्थानींसाठी हेल्पलाइन
इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेले हिंदुस्थानी नागरिक सातत्याने मदतीसाठी आर्जव करत आहेत. हे लक्षात घेऊन इस्रायलमधील हिंदुस्थानी प्रतिनिधी कार्यालयाने हेल्पलाईनचे क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांना 972-35226748 आणि 972-543278392 या क्रमांकावर तसेच [email protected] या ई-मेल आयडीवर मदतीसाठी संपर्क साधता येईल.
पुतिन यांनी अमेरिकेवर डागली तोफ
इस्रायल-हमास युद्धाबद्दल पाचव्या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी भाष्य केले आहे. हे युद्ध अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. अमेरिका पॅलेस्टाईनचे हित नजरेआड करत आहे, अशा शब्दांत पुतिन यांनी अमेरिकेवर तोफ डागली आहे.
हिंदुस्थानचे ऑपरेशन अजय आजपासून
युद्धग्रस्त इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱया हिंदुस्थानी नागरिकांसाठी ऑपरेशन अजयची घोषणा हिंदुस्थानने रात्री केली. या नागरिकांना आणण्यासाठी पहिले चार्टर्ड विमान गुरुवारी सकाळी इस्रायलकडे रवाना होईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

























































