सामना प्रतिनीधी । तेहरान
आभाळातले ढग चोरणे अजबच! इस्रायलने आमचे पावसाळी ढग चोरल्याचा आरोप इराणने केला आहे. एवढेच नाही तर तंत्रज्ञानाच्या मदतीने इस्रायलने पावसाळी वातावरणच बदलून टाकल्याचेही इराणने म्हटले आहे.
इराणचे ब्रिगेडियर जनरल गुलाम रेजा जलाली यांनी खास पत्रकार परिषदेत हा आरोप केला. इस्रायलने तांत्रिक ताकदीच्या जोरावर इराणच्या हवामानात बदल केल्याचा स्पष्ट आरोपी जलाली यांनी केला. इराणवर पर्जन्यछाया करणारे ढग इस्रायलच्या आसमंतातून येतात. इस्रायल या ढगातील पाणी काढून घेत असून, कोरडेठाक झालेले वांझोटे ढग आमच्याकडे पाठवत आहेत. पाऊसच नसल्यामुळे इराणवर दुष्काळी ढग घोंगावत असल्याचे जलाली म्हणाले. अफगाणिस्तान आणि भूमध्य सागराच्या परिसरात २२०० मीटरपेक्षा जास्त उंचीचे डोंगर बर्फाने आच्छादलेले आहेत. परंतु इराणची परिस्थिती त्याहून भिन्न आहे याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
इराणचे ब्रिगेडियर गुलाम जलाली यांनी इस्रायलने पावसाळी ढग पळवल्याचा आरोप केला आहे. मात्र इराणी हवामान खात्याने जलाली यांच्याच कानफटात मारले. इस्रायलने ढग पळवल्याचा आरोप निखालस खोटा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
























































