अरुणाचलमध्ये आगडोंब; उपमुख्यमंत्र्यांचा बंगला पेटवला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। इटानगर

अरुणाचल प्रदेशचे मूळ रहिवाशी नसलेल्या नामसाई आणि छांगलाग जिल्हय़ांतील आदिवासींना स्थायी निवासी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलकांनी इटानगर येथील पोलीस ठाणे पेटवून देतानाच उपमुख्यमंत्री चाव मेन यांचा बंगलाही पेटवला.

या हिंसाचारानंतर उपमुख्यमंत्र्यांना नामसाई जिल्हय़ात हलविण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर इटानगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.

हिंसक जमावाला पांगवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. जाळपोळीत 50 गाडय़ा खाक झाल्या असून 100 गाडय़ांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या हिंसक आंदोलनात 21 आंदोलकांची धरपकड केली आहे.

अरुणाचल प्रदेशचे मूळ रहिवाशी नसलेल्या आदिवासींना स्थायी समिती प्रमाणपत्र देण्याची शिफारस राज्य सरकारच्या सयुंक्त उच्चाधिकार समितीने केली आहे. त्याविरोधात राज्यात आगडोंब उसळला आहे. तेथील अनेक संघटनांनी गुरुवार आणि शुक्रवारी 48 तासांच्या बंदची हाक दिली होती. नामसाई आणि छांगलांग जिल्हय़ांतील संबंधित आदिवासींना स्थायी निवास प्रमाणपत्र दिल्यास भूमिपुत्रांच्या अधिकारांवर गंडांतर येईल, असे आंदोलन करणाऱया संघटनांचे म्हणणे आहे.

त्या आदिवासींना स्थायी निवास प्रमाणपत्र देण्याच्या उच्चाधिकार समितीच्या शिफारशीला पाठिंबा देणाऱया ‘ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियन’ आणि ‘ऑल न्यहशी स्टुडंट्स युनियन’ यांची कार्यालयेही आंदोलकांनी पेटवली.