
सामना ऑनलाईन। इटली
जगातील सर्वोत्कृष्ट गिर्यारोहकांमध्ये समावेश असलेल्या इंग्लंडच्या टॉम बलार्ड (30) या गिर्यारोहकाचा व त्याचा इटालियन मित्र डेनियल नर्डी (42) याचा पाकिस्तानमधील नंगा पर्वतावर गारठून मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी डेनियलने 20,700 फूट उंचावरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पण त्यानंतर टॉम व डेनियल बेपत्ता झाले होते. तेव्हापासून गिर्यारोहक त्यांचा शोध घेत होते.

अखेर स्पेनचा गिर्यारोहक अॅलेक्स टक्सिकोन याला या दोघांचे मृतदेह आढळले. टॉमची आई एलिसन हाग्रिव्स ही देखील गिर्यारोहक होती. तिच्याचकडून प्रेरणा घेत टॉमने गिर्यारोहक बनण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याच्या आईने त्याला प्रशिक्षणही दिले होते. पण 1995 साली K2 या शिखरावरून उतरताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी कुठलाही आधार न घेता एवरेस्ट चढणारी प्रथम महिला म्हणून अॅलेक्स यांना गौरवण्यात आले होते.

डेनियलने 24 फेब्रुवारी रोजी घरातल्यांशी संपर्कही केला होता. त्यावेळी नंगा पर्वताच्या शिखरावर जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. जगातील सर्वात उंच शिखरांमध्ये नंगा पर्वताचा 9 वा क्रमांक लागतो. हा पर्वत चढताना अनेकजणांना जीव गमवावा लागला आहे.

पर्वताच्या ज्या भागात टॉम आणि डेनियलचा मृतदेह सापडला तो चढण्यास अत्यंत कठीण होता असे अॅलेक्स याने सांगितले आहे.


























































