
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीर मधील बांदीपूरा जिल्हयातील संबल भागात चॉकलेटचे आमिष दाखवून एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शेकडो स्थानिक रस्त्यावर उतरले असून 12 हून अधिक ठिकाणी संतप्त नागरिकांनी निदर्शने केली.
इफ्तारच्या आधी गुरुवारी पीडित मुलीच्या शेजारील गावात राहणारा एक तरुण संबल येथे आला होता. मुलगी एकटीच घराबाहेर खेळत असल्याचे त्याने बघितले. ही संधी साधून त्याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत तिला जवळ बोलावले. त्यानंतर तिचे अपहरण करून त्याने तिला गावाबाहेरील निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व तो पळून गेला.
दरम्यान, घराबाहेर खेळत असणारी मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या घरातल्यांनी शोधा शोध सुरू केली. त्यावेळी त्यांना ती गावाबाहेरील निर्जनस्थळी सापडली. मुलगी रडत असल्याने घरातल्यांनी तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचे नाव विचारले. तेव्हा तिने बाजूच्या गावात राहणाऱ्या पण मुलीच्या घरातल्यांच्या परिचयातील एकाचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली.
पीडित मुलीवर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच बांदीपोराचे उपायुक्त शाहबाज मिर्जा यांनी दोषीला कडक शिक्षा नक्की मिळेल असे आश्वासन देत नागरिकांना शांतता राखण्यास सांगितले आहे.



























































