‘जबान संभालके’ पुन्हा येणार वेबसीरीजच्या रुपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जवळपास दोन दशकांपूर्वी हिंदी शिकणाऱ्या वल्लींवर बेतलेली जबान संभालके ही मालिका आठवतेय का? विविध भाषिक एका शिक्षकाकडे हिंदी शिकण्यासाठी येतात आणि त्यातून उडणारी धमाल या मालिकेत दाखवण्यात आली होती. त्यावेळी ही मालिका चांगलीच गाजली होती. आता तीच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यावेळी मात्र ती एका वेबसीरीजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर हे त्या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासह शुभा खोटे, विजू खोटे, अश्विनी बलसावर, तनाझ इराणी, टॉम अल्टर असे अनेक तगडे कलाकार त्या मालिकेत होते. माइंड युवर लँग्वेज या मूळ इंग्रजी शोचं ते हिंदी रुपांतर होतं. विविध प्रांतातले लोक हिंदी शिकण्यासाठी म्हणून एका संस्थेत जमा होतात आणि त्यांना हिंदी शिकवताना उडणारी धमाल या मालिकेत दाखवण्यात आली होती. आता या वेबसीरीजमध्ये सुमीत राघवन, बख्तियार इराणी, रुपाली भोसले, राकेश श्रीवास्तव, शोमा आनंद, तनु खान असे कलाकार दिसणार आहेत.

अर्थात ही वेबसीरीज नेमकी कधी प्रदर्शित होणार आहे, याबाबत अद्याप काहीही खुलासा झालेला नाही. मात्र, चित्रीकरण सुरू झाल्यामुळे लवकरच ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

summary- jaban sambhalke will be in web series avatar