
>> जगदिश काबरे
नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी परिपक्वता येणे गरजेचे असते, पण आज लग्न हा पवित्र संस्कार राहिलेला नसून दोन व्यक्तींच्या सहजीवनात या नात्याचे रूपांतर झालेले आहे. सगळ्या नात्यातून तावून-सुलाखून आजची पिढी पुनःपुन्हा नवीन नाती जोडताना दिसत आहे. त्यांना हे कळू लागलेले आहे की, आयुष्यात आपल्याला हवे तसे सगळे मिळतेच असे नाही. त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध थोडे जरी कोणी वागले तरी त्याच्याशी नाते तोडून टाकण्याचा उतावीळपणा करणे योग्य नाही. तडजोडीशिवाय कोणतेही नाते निभावणे अशक्यच असते. फक्त प्रत्येक पिढीची तडजोड वेगळ्या प्रकारची असते आणि पिढी दर पिढी ते घडतच असते. पण नवीन पिढी आजच्या जगात नात्यांकडे कशी पाहते ते समजून घेतले पाहिजे.
आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे’ हे जरी खरे असले, तीच माणसे, त्यांच्या त्याच त्या कमी-अधिक, चांगल्या-वाईट आयुष्याच्या कहाण्या असल्या तरी आयुष्य हे केव्हाही आपल्याला हव्या त्या रंगांनी भरता येईल असा पांढराशुभ्र कॅनव्हास आहे हेच खरे. उद्याचा दिवस आपल्या जीवनात नक्की उगवणारच आहे याची खात्री नसतानाही आपण अलार्म लावून झोपतोच. तो विश्वासच आपल्याला नवे आयुष्य देऊन जातो. पिढी दर पिढी असे घडतच असते. प्रत्येक पिढीच्या कालखंडाचे एक वैशिष्ट्य असते. म्हणून अशा पिढीला त्या कालखंडाचे नामाभिधान प्राप्त होते. 18व्या शतकापर्यंत पिढय़ांमध्ये होणारा बदल हा अत्यंत नगण्य होता. कारण वैज्ञानिक शोधांची घोडदौड सुरू व्हायची होती, पण 19 व्या शतकामध्ये वैज्ञानिक शोधांच्या वेगामुळे मात्र दर पिढीत झपाटय़ाने बदल होताना दिसले आणि म्हणून त्या पिढय़ांना वैशिष्ट्यपूर्ण नावे दिली गेली. ती अशी…
लॉस्ट जनरेशन : 1888 ते 1900 या कालावधीत जन्मलेल्या पिढीला हे नामाभिधान लाभलेले आहे. हे नाव अमेरिकन कादंबरीकार गर्टूड स्टीन यांनी दिले आहे.
ग्रेटेस्ट जनरेशन : 1901 ते 1927 या कालावधीतील पहिले महायुद्ध भोगलेली ही पिढी.
सायलेंट जनरेशन : 1928 ते 1945 या कालावधीत पहिल्या महायुद्धानंतरची महामंदी आणि महागाईची झळ या पिढीने सोसली. तसेच याच काळात तंत्रज्ञानाला प्रगती मिळाली.
बेबी बुमर्स : 1946 ते 1964 या कालावधीतील पिढीने अमेरिकेतील स्पेस वॉर अनुभवले. या पिढीने रेडिओ आणि टीव्ही ही संपर्काची प्रमुख साधने होताना पाहिली. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, मूलभूत हक्क अशा तत्त्वांचा पुरस्कार करत आधुनिकता स्वीकारली.
जनरेशन एक्स : 1965 ते 1980 च्या दरम्यान जन्मलेल्या मुलांना ही संज्ञा कॅनडियन लेखक डग्लस कूपलँड यांनी दिली. या काळात कॉम्प्युटर स्थिरस्थावर होऊ लागला होता आणि या पिढीने अॅनलॉग ते डिजिटल हा टप्पा अनुभवला. याच पिढीच्या काळात व्हिडीओ गेम्स, फ्लॉपी डिस्क, सीडी अशा तंत्रज्ञानाचा उदय आणि अस्त होताना दिसला.
मिलेनियल्स जनरेशन : 1981 ते 1994 या कालखंडात जन्मलेल्या पिढीने डायल-अप ते इंटरनेट आणि फ्लॉपी डिस्क ते क्लाऊड स्टोरेज असे बदल अनुभवले. केबल नेटवर्क हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आणि ही पिढी खऱ्या अर्थाने पहिली टेक्नो सॅव्ही झाली.
जनरेशन झेड : 1995 ते 2009 या कालावधीत जन्मलेली ही पिढी! ही पिढी सामाजिक जाणिवा, भाषा, फॅशन, संगीत, चित्रपट, खाद्यपदार्थ या सगळ्या बाबतीत जागतिक झाली असून करीअरच्या रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्या वाटा धुंडाळणारी आहे.
जनरेशन अल्फा : 2010 ते 2024 दरम्यान जन्मलेली ही पिढी खऱ्या अर्थाने 21 व्या शतकात जन्मलेली असून मोबाइल, इंटरनेट यांच्याशी त्यांची सलगी चालायला लागण्याच्या आधीच निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांनी टच क्रीनवर अगदी बालवयातच प्रभुत्व मिळवले आहे.
जनरेशन बीटा : 2025 ते 2039 या कालावधीत जन्माला येणाऱ्या पिढीला हे नाव दिले गेलेले आहे. यांच्या जीवनात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन हा अविभाज्य भाग असेल. त्यामुळे त्यांच्या जीवनात आभासी जग आणि वास्तव जग यातील फरक अत्यंत धूसर असेल.
अशा या जेन झेड, जेन अल्फा, जेन बीटा या नवीन पिढ्यांत नात्यांचीसुद्धा खूप नवीन वळणदार वळणे येत आहेत. लग्नापूर्वीचे ‘सिमर डेटिंग’, ‘सॉफ्ट लाँच’ अशा डेटिंग ट्रेंड्स वापरून सावधपणे जोडीदाराला समजावून घेण्याचा ते प्रयत्न करताहेत, पण असे काही ऐकून आज पन्नाशीच्या पुढे असलेली पिढी मात्र गर्भगळीत होत आहे. तेव्हा नवीन पिढी आजच्या जगात नात्यांकडे कसे पाहते हे समजणे आवश्यक आहे. त्या नात्यांना त्यांनी काही नवनवीन नावेही दिलेली आहेत.
DADT नाते: या नात्यात दोघे एकमेकांचा भूतकाळ विचारत नसतात. भूतकाळातील घटनांमुळे वाद घडू नयेत आणि भविष्यकाळ सुखाचा जावा म्हणून ते ‘डोन्ट आस्क डोन्ट टेल’ म्हणजे DADT प्रकारचे नाते अमलात आणतात. इगॅलिटेरियन रिलेशनशिप: या नात्यात सगळ्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे निर्णय तसेच घरातील कामे आणि सत्ताकेंद्र दोघांनी मिळून सांभाळायची असतात. स्लिप डिव्होर्स : या नात्यात नवरा-बायको वेगवेगळ्या खोलीत झोपतात आणि तेही स्वखुशीने. कारण दोघांच्याही कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दोघांनाही शांत झोप मिळणे आवश्यक असते. सुट्टीच्या दिवशी मात्र ते मनमुराद आयुष्य भोगतात. बॉयसोबर : हे नाते स्वतच्या एकटेपणाला जाणून घेण्यासाठी असते. ब्रेकअप झाल्यावर स्वतला वेळ देणे, स्वतबरोबरच राहणे आणि आत्मपरीक्षण करणे हे या नात्यात अपेक्षित असते. आपल्या तब्येतीसाठी जसे आपण ‘डिटॉक्स डाएट’ करतो तसेच सर्व अनुभवातून ‘डिटॉक्स’ होण्यासाठी हे नाते या पिढीला आवश्यक वाटते. ब्रेकअप सेलिब्रेशन : हल्ली प्रेम आणि ब्रेकअप होणे खूपच सामान्य झालेले आहे. कारण तरुणांची वये वाढलेली असतात. प्रत्येकाचे विचार तयार झालेले असतात. त्यामुळेच तडजोड, संयम आणि प्रतीक्षेची कसोटी लागते. आर्थिक स्वातंत्र्यामुळे आणि विविध समाज माध्यमांमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे महत्त्व वाढलेले असल्यामुळे जरा खुट्ट झाले की, ब्रेकअप होणे सहज शक्य असते, पण आजची पिढी त्याला एवढी सरावली आहे की, प्रेमात ते देवदास होत नाहीत की ब्रेकअपमुळे उदासही होत नाहीत. उलट प्रेमभंगामुळे आलेला ताण घालवण्यासाठी ब्रेकअप सेलिब्रेशन त्यांना उपयुक्त वाटतो. लव्ह बोमिंग : या नात्यात जोडीदार तुम्हाला महागडे गिफ्ट देऊन ‘मी तुझ्यावर किती प्रेम करतो/करते’ दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. थ्रोनिंग : या नात्यात जोडीदार तुमच्यावर प्रेम करत नाही, तर तुमची संपत्ती, तुमचे समाजातील स्थान यावर प्रेम करत असतो आणि त्याचा उपयोग आपले स्टेटस वाढविण्यासाठी करतो. बेन्चिंग : या नात्यात एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडतो, अडीअडचणीच्या वेळी त्या व्यक्तीची मदतही घेतली जाते आणि मन मोकळे करायला त्या व्यक्तीचा खांदा योग्य वाटतो, पण तिच्याकडे आयुष्याचा जोडीदार म्हणून बघितले जात नाही. सॉफ्ट लाँच : या नात्यात आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे मान्य केले जाते, परंतु जोडीदार कोण आहे हे जाहीर केले जात नाही. हार्ड लाँच : या नात्यात आपल्या जोडीदाराची ओळख लपवली जात नाही. उलट ते खुलेपणाने जाहीर केले जाते. नॅनोशिप : हे नाते डेटिंग अॅपमधून निर्माण होत असते. त्यामुळे या नात्यात साता जन्माचा तर जाऊ दे, पण आयुष्यभरासाठी साथ देणारा जोडीदार मिळणेही कठीण असते. बऱ्याचदा तर हे नाते वन नाइट स्टॅन्ड पर्यंत मर्यादित असते. फ्लिया बेगिंग : या नात्यात वारंवार वादविवाद होऊन ब्रेकअप झाले तरीही त्या दोन व्यक्ती पुन्हा एकत्र येतात. तसेच या नात्यात ‘मायक्रो चीटिंग’ झाले तर ‘रॉटन रिलेशनशिप’ मान्य करून भावनिक न होता व्यावहारिक पातळीवर नाते टिकवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. TTMM : या नात्यात अनेकदा जोडपी घरातील नियमित खर्च निम्मा निम्मा वाटून घेतात, तर वैयक्तिक, सामाजिक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसाठीचा खर्च ज्याचा त्याने करायचा असतो. म्हणून या नात्याला नाव दिले आहे… ‘तू तुझं मी माझं’ म्हणजेच ‘टीटीएमएम’.
थोडक्यात काय, तर नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी परिपक्वता येणे गरजेचे आहे. म्हणून वर दिलेल्या सगळ्या नात्यातून तावून-सुलाखून आजची पिढी पुनःपुन्हा नवीन नाती जोडत आहे. त्यांना हे कळू लागलेले आहे की, आयुष्यात आपल्याला हवे तसे सगळे मिळतेच असे नाही. त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध थोडे जरी कोणी वागले तरी त्याच्याशी नाते तोडून टाकण्याचा उतावीळपणा करणे योग्य नाही. तडजोडीशिवाय कोणतेही नाते निभावणे अशक्यच असते. कारण आयुष्य हे केवळ घटनांचा अभ्यास नसतो, तर घटकांच्या बदलांचाही अभ्यास असतो.
अश्मयुग ते आजचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग यातील विकासाच्या बदलांचे परिणाम मानवी समाजावर झाले आहेत आणि त्यातून प्रगतीचे क्षेत्र मानवाने पादाक्रांत केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘न भूतो न भविष्यति’ धोका आहे. त्यामुळे मानवाच्या परस्पर संबंधांच्या शहाणपणाची कसोटी पाहणारा हा काळ आहे. तेव्हा ‘मानव हा नुसताच बुद्धिमान प्राणी नसून विश्वाला समजून घेणारा सुज्ञ प्राणी आहे’, असे म्हणताना हा सुज्ञपणा जेव्हा नात्यात निर्माण होईल तेव्हाच नात्याची वीण भरतकामातील सौंदर्यासारखी आस्वादक होईल.