
मुंबईसह महाराष्ट्रात गुणवत्तेची कमी नाही, पण जागतिक स्तरावर सातत्याने यश मिळवण्यासाठी खेळाडूंना अव्वल दर्जाच्या सोयीसुविधा मिळायला हव्यात. त्यासाठी महाराष्ट्रात बॉक्सिंग सेंटरची निर्मिती व्हायला हवी. त्यामध्ये खेळाडूंसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील. या सेंटरमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या तीन ते चार रिंग, इनडोअर जागा, जिम, तीन ते चार कोचेसची नियुक्ती यांसारख्या इतर बाबींचा समावेश असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवणार नाही, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी बॉक्सिंग संघटनेचे सेक्रेटरी जनरल जय कवळी यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.
पटियाळा येथे सुरू आहे कॅम्प
कोरोनामुळे सर्वसामान्य बॉक्सिंगचा सराव केव्हा सुरू होईल हे माहीत नाही, पण जय कवळी यांनी ऑलिम्पिकशी निगडित असलेल्या खेळाडूंसाठी पटियाळा येथे कॅम्प सुरू असल्याचे सांगितले. या कॅम्पमध्ये 11 बॉक्सर्स, 12 कोचेस व इतर अधिकारी यांचा समावेश आहे.
शॅडो बॉक्सिंगला चांगला प्रतिसाद
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने शॅडो बॉक्सिंग हा उपक्रमही यादरम्यान राबवला. शॅडो बॉक्सिंगचा व्हिडीओ अडीच हजारांच्या वर जनतेने पाहिला. जगभरातून या उपक्रमाचे कौतुक होऊ लागले. आमचा हा प्रयोग यशस्वी ठरला. येत्या राष्ट्रीय क्रीडा दिनी यामध्ये विजेत्या होणाऱया खेळाडूंना बक्षिसे दिली जाणार आहेत, असे जय कवळी यांनी सांगितले.
कोरोना, लॉकडाऊनच्या काळातही उपक्रम राबवला
कोरोना व लॉकडाऊनमुळे अखिल हिंदुस्थानी व जिल्हास्तरीय स्पर्धा रद्द करण्यात आल्या, पण त्यानंतर हिंदुस्थानी बॉक्सिंग संघटना व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्याकडून ऑनलाइन शिबिर, सेमिनार घेण्यात आले. या उपक्रमाला दणदणीत प्रतिसादही लाभला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनकडून ट्रेनिंग ऍण्ड डेव्हलपमेण्ट प्रोग्राम राबवला. या प्रोग्राममध्ये मान्यवरांचे मार्गदर्शनही लाभले. यामध्ये कोचेस, ऍडमिनिस्ट्रेटर, जिल्हा सेक्रेटरी, महिला बॉक्सर, कोच व पदाधिकारी, सर्व बॉक्सर्स, रेफ्री व पालक, जज, तांत्रिक अधिकारी यांच्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, असे जय कवळी यांनी नमूद केले.
बॉक्सर्सच्या नोकऱयांसाठी पुढाकार घ्यायला हवा
बॉक्सिंग हा खेळ मुंबईसह महाराष्ट्रात खेळला जातोय. राज्यात 66 रिंगही आहेत. शालेय व कॉलेज स्तरावरही विद्यार्थी या खेळाकडे आकर्षित होत आहेत. सरकारी क्षेत्रात पाच टक्के नोकऱया या खेळामधून मिळतात, पण इतर क्षेत्रांमधूनही बॉक्सर्ससाठी पुढाकार घ्यायला हवा. नोकरी मिळाल्यास खेळाडू निःसंकोचपणे राज्यासाठी तसेच देशासाठी खेळू शकतो, असे जय कवळी यांना वाटते.
खेलो इंडियामध्ये बॉक्सिंगला घवघवीत यश
मुंबईसह महाराष्ट्र बॉक्सिंगमध्ये कात टाकतोय. खेलो इंडिया या क्रीडा महोत्सवात महाराष्ट्राने जिंकलेल्या एकूण पदकांपैकी 25 टक्के पदके ही बॉक्सिंग या खेळामधून मिळवलेली आहेत. यावरूनच या खेळामधील प्रगती प्रकर्षाने दिसून येत आहे. सध्या अनंता चोपडे, भावेश कट्टीमनी, अल्फिया पठाण, मितिका गुणिले, निखिल दुबे यांसारख्या खेळाडूंनी बॉक्सिंगगच्या रिंगणात जबरदस्त कामगिरी करून दाखवलीय, अशी स्तुतीही जय कवळी यांनी यावेळी केलीय.






























































