
सामना ऑनलाईन, बीड
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असणारे जयदत्त क्षीरसागर यांनी आता बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यासाठी प्रचाराला जाहीरपणे सुरुवात केली आहे. काही मंडळी निवडणूका आल्या की सुपार्या घेवून तुतार्या वाजवतात, अशा लोकांना बुक्का लावून त्यांची जागा दाखवा आणि उद्याच्या निवडणुकीत डॉ.प्रीतम मुंडेंना प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. खालापुरी ता.बीड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि प्रीतम मुंडे यांचे कौतुक करत प्रीतम मुंडे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. नरेंद्र मोदी सक्षम पंतप्रधान असून त्यांनी पाच वर्षात देशाची सुरक्षितता आणि सर्व सामान्य जनतेचे हित जोपासलं आहे असं ते म्हणाले.सर्व धर्म समभावाचे राजकारण करणार्या पंतप्रधानांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी आम्ही प्रीतम मुंडे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असं क्षीरसागर म्हणाले.
जाती पातीच्या नावाने मतदान मागणे हा खर्या अर्थाने आचारसंहितेचा भंग असून,50 वर्ष देशात आणि राज्यात सत्ता भोगणार्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही असं म्हणत क्षीरसागर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. मराठा आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस सरकारने मार्गी लावून इतिहास घडवला,मोदी सरकारने 10% आरक्षण सवर्ण लोकांना देवून प्रगतीच्या वाटेवर आणले असं म्हणत क्षीरसागर यांनी फडणवीस यांच्याही कार्याचा गौरव केला.

































































