
उदय जोशी । बीड
खरीप हंगामामध्ये इतर पिकाचा विमा देणाऱ्या कंपनीने सोयाबीन पिकाचा विमा देताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. विमा कंपन्यांनी तब्बल साडेचार हजार शेतकऱ्यांना या यादीतून वगळले आहे. या बाबत रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर लक्ष घालणार आहेत. वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. त्याची बाजू खरी असेल तर सोयाबीन चा विमा त्याच्या पदरात पडेल असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘सामना’शी बोलताना दिला.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. खरीप हंगामातील दुष्काळी भागातील या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने इतर पिकाचा विमा दिला. कालांतराने सोयाबीनसाठी ही विमा मंजूर झाला मात्र, सोयाबीन पिकाचा विमा देताना विमा कंपन्यांनी मनमानी केली, चुकीची कारणे समोर करून शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकण्याचे पाप या कंपनीने केले. विमा देण्याच्या यादीतून तब्बल साडेचार हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
शनिवारी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या प्रकरणाची दखल घेतली. मी वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. साडेचार हजार शेतकऱयांना का वगळण्यात आले याची तपासणी केली जाईल. शेतकऱ्यांची बाजू पारदर्शक असेल तर त्या शेतकऱ्याच्या पदरात सोयाबिनचा पीक विमा पडला पाहिजे या साठी आपण लक्ष घालू असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी ‘सामना’शी बोलतांना व्यक्त केला आहे

























































