
सर्वत्र दहीकाला उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी मंडळ तसेच आयोजकांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असून रेल्वे पोलिसांनीदेखील खबरदारी घेतली आहे. फलाटावर किंवा धावत्या लोकलवर पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पण तरी फुगे मारताना कोणी सापडलाच तर अशांची खैर नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला.
दहीकाला साजरा करताना काही अतिउत्साही लोक दहीहंडी पथकांव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिक तसेच लोकलच्या प्रवाशांवर फुगे मारण्याचा आगाऊपणा करतात. बऱ्याचदा पाण्याने भरलेला फुगा डोळ्याला लागून डोळा निकामी होण्याचे प्रकार घडतात. तसेच धावत्या लोकलने प्रवास करताना अचानक येऊन फुगा लागल्याने गंभीर दुखापत किंवा मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. हे प्रकार अजिबात घडू नयेत यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. दहीकाल्याच्या दिवशी सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून फलाट व आजूबाजूच्या परिसरावर वॉच ठेवण्यात येणार आहे. कोणी फुगा घेऊन सापडला तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात येईल. शिवाय कोणी फुगा मारला आणि फुग्यामुळे कोणी जखमी झाला तर संबंधितावर गंभीर कलमानुसार कठोर कारवाई करणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
फलाटावर येऊन कोणी फुगा मारण्याची हिंमतच करू नये पण रेल्वेबाहेरच्या हद्दीतूनदेखील लोकलवर पाण्याचा फुगा मारू नये. मुळात फुगा मारणे गुन्हा आहे आणि हा गुन्हा करताना कोणी सापडला तर मात्र संबंधिताला कायद्यानुसार चांगली अद्दल घडवू- रवींद्र सेनगावकर, रेल्वे पोलीस आयुक्त
रेल्वे ट्रकला लागून झोपडपट्टी किंवा लोकवस्ती असते. तेथून फुगा मारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. त्यात प्रवासी जखमीदेखील झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रवासीदेखील आपलेच बांधव आहेत. त्यांच्यावर पाण्याने भरलेले फुगे मारण्याचे प्रकार कोणी करू नयेत. उत्सवाला आणि मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. पाण्याचे फुगे कोणावरही न मारण्याची सर्वांनी शपथ घेऊया आणि दहीकाला उत्सहात साजरा करूया, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


























































