
जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील तलाव परिसरात फिरण्यास आलेल्या प्रेमीयुगुलाला चौघांनी बेदम मारहाण केली. तसेच तरुणीची छेडछाड करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओही आरोपींनी व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिह्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी चारजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहेत.
गोंदेगाव परिसरातील ही घटना असून तीन दिवसांपूर्वी बुलडाणा जिह्यातील तरुण-तरुणी गोंदेगावातील एकांत असलेल्या तलावावर फिरायला आले होते. हे युगुल तळ्याजवळ बसलेले असताना गावगुंडांनी त्यांना गाठले आणि धमकावायला सुरुवात केली. प्रेमीयुगुलाने आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, फक्त फिरायला आल्याचे सांगितले. मात्र गावगुंडांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना बेदम मारहाण केली आणि तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी संबंधित प्रेमीयुगलाने बदनामीच्या भीतीपोटी कोणतीही तक्रार केली नव्हती.
या गावगुंडांनी प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. व्हिडीओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरफटत नेताना दिसत आहेत. सोबतचा तरुण कृपया तिला सोडा, आम्ही परत येणार नाही अशा शब्दांत गयावया करत होता, मात्र तरुणाचे काहीही ऐकून न घेता गावगुंड मारहाण करत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली.


























































