
जालना जिल्ह्यातील मंठा येथील बाजार समितीच्या आवारामध्ये प्रदीप भाऊराव कायंदे (40) या तरुणाचा 8 एप्रिल रोजी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कायंदे याची एका गे अॅपवरून सोपान बोराडे नावाच्या तरुणासोबत ओळख झाली होती. त्या दोघांमध्ये लैंगिक संबंधही प्रस्थापित झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादावरून सोपानने प्रदीपची निर्घृणपणे हत्या केली.
प्रदीप भाऊराव कायंदे हा एका एजन्सीमार्फत बँकवसुली अधिकारी म्हणून कार्यरत होता. विवाहित असूनही प्रदीपचे समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी फेमस असलेल्या ‘बोल्ड गे’ या अॅपच्या माध्यमतून मंठा येथील एका ग्रुपच्या तो संपर्कात होता. प्रदीप नोकरीला जालना येथे होते. अनेकदा प्रदीप हा गावी न जाता मंठा येथे त्याच्या समलिंगी मित्राकडे जात असे. दरम्यान ७ एप्रिल रोजी ड्युटी आटोपून प्रदीप कायंदे हा रात्री जालना येथून थेट मंठा येथे त्याचा मित्र सोपान सदाशिव बोराडे याच्या शांतीनगर घरी मुक्कामाला पोहोचला होता. तेथे त्यांच्यात लैंगिक संबंधही प्रस्थापित झाले, प्रदीप हा सोपान सोबतच त्याच्या पत्नीशीही लैगिंक संबंध ठेवायचा. त्यावरून सोपान व प्रदीपमध्ये वाद झाला. या वादातूनच सोपानने प्रदीपची हत्या केली. सोपानने त्याच्या काही मित्रांना बोलावून बेदम मारहाण करून आणि डोक्यावर घाव घातले. यात प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. सोपान बोराडे याने त्याचा होमगार्ड भाऊ प्रकाश बोराडे याच्या मदतीने बाजार समितीच्या आवारात असलेल्या जगदंबा जिनिंगमध्ये नेऊन टाकले होते.
याप्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही आणि मोबाईल सभांषणही हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणात मुख्य सूत्रधार सोपान बोराडे, त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी आरोपी असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे,अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे,परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष बनकर, मांगीलाल राठोड, दीपक आडे,श्याम गायके, प्रशांत काळे, सुनील इलग,आकाश राऊत ब्रह्मानंद जायभाये, आनंद ढवळे, महिला पोलीस कर्मचारी सविता फुलमाळी, मार्कंडे आदींनी ही कामगिरी केली आहे.




























































