तरुणाचा प्रामाणिकपणा… शेतकऱ्याची तब्बल दोन लाखांची रक्कम केली परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरातील एका तरुणाने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे. त्याला भर रस्त्यात सापडलेले चक्क दोन लाखांचे बंडल त्याने ज्याचे होते त्याला परत केले आहे. याबद्दल या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश वाकडे असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

जाफराबाद तालुक्यातील खापरखेडा या गावातील शेतकरी विनोद सपंत गवळी यांचे घराचे काम सुरू असल्या कारणाने त्याने जाफराबाद येथे बांधकाम मटेरियल आणण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानात जात असतांना त्याच्या बॅग मधून पैसे पडले. याची त्यांना कल्पना सुध्दा नव्हती. मात्र त्याच्या मागाहून जाफराबाद येथील मालेगाव गल्लीतील योगेश प्रकाश वाकडे हा मोटार सायकलने येत असता त्याला हे दोन लाखाचे बंडल आढळून आले. ते बंडल पुढे गेलेल्या मोटार सायकलवरील विनोद गवळी यांची होती हे लक्षात आल्याने त्यांनी आपल्या मोटार सायकलचा स्पीड वाढवून शिवाजी महाराज चौकात गवळी यांच्याबाबत विचारपुस केली असता. दरम्यान बॅगमध्ये पैशाचे बंडल न दिसल्याने संपत गवळी घाबरले. मात्र त्याच दरम्यान योगेश त्यांचे पैसे घेऊन तेथे पोहोचला. गवळी यांनी योगेशचे व त्याच्या मित्रांचे आभार मानले.

ही बातमी सगळीकडे समजताच येथील तरुण व्यापारी अमोल पडघन यांनी या तिघांना आपल्या बालाजी कृषी केंद्रात बोलावून या तिघांचा सत्कार करुन त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम केला. हरविलेले दोन लाख सहजी परत मिळाल्याने विनोद गवळी यांना आनंद झाला. प्रामाणिक पणा गेल्या 3 ते 4 वर्षापुर्वी योगेश वाकडेने दाखविला होता. एका लग्न सोहळ्यात त्याला सात तोळे सोन्याची माळ सापडली होती. त्याने ती सुध्दा निस्वार्थ बुध्दीने परत केली.