
जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पती व पंचायत समिती जालनाचे ग्रामीण गृह निर्माण (कंत्राटी) अभियंत्याला घरकुल मंजूरीसाठी 10 हजार रुपयांपैकी 5 हजारांची लाच घेताना पकडले. जालना एसीबीने आज पंचायत समितीच्या आवारात ही कारवाई केली.
आरोपी नारायण कुंडलिकराव मगर उपसरपंचाचे पती रा. हस्ते पिंपळगाव ता. जि. जालना, अमोल अंभुरे, ग्रामीण गृह निर्माण अभियंता, (कंत्राटी) पंचायत समिती जालना असे नावे आहेत. मौजे हस्ते पिंपळगाव येथील ग्रामसभेने ठराव घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचे प्रपत्र तयार करून मंजुरीसाठी पंचायत समिती जालना येथे पाठवले होते. तेव्हा घरकुल यादीत तक्रारदार यांचे आईचे नाव असल्याने तक्रारदार यांनी आरोपी मगर याला घरकुल लवकर मंजुर करून दे, अशी विनंती केली, तेव्हा आरोपीने तक्रारदार यांना माझी बायको उपसरपंच आहे, मी तुमचे घरकुल लवकर मंजुर करतो, तुम्ही मला 10 हजार रूपये द्या. असे म्हणून लाचेची मागणी करुन पंचायत समिती मधील अभियंता अंभुरे सोबत माझी चांगली ओळख आहे. असे म्हणून तक्रारदार यांना आरोपी अंभुरे यांच्याकडे घेऊन गेला असता आरोपी अंभुरे यानेही तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन देवुन दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांना आज 30 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयाचे आवारात जालना येथे 10 हजार रूपये लाचेची मागणी करून आजच 5 हजार रुपये देऊन राहीलेले 5 हजार रूपये दोन तीन दिवसांनी द्यायचे असे म्हणुन आरोपी मगर हा स्वत: लाचेची रक्कम स्विकारण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले.
सापळा कारवाई दरम्यान पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर रोडवर जालना येथे आरोपी नारायण मगर याने घरकुल लवकर मिळवुन देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून 5 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी मगर याचेकडून 5 हजार लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी नारायण मगर यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत पोलीस ठाणे कदीम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुजित बडे,जावेद शेख, शिवानंद खुळे, शिवाजी जमधडे, संदीपान लहाने, कृष्णा देठे, ज्ञानदेव जुंबड यांनी केली.



























































