
वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांची वारी ‘मुक्ताई’ वर पोहोचली. राजकीय हाडवैरी असलेले एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी फडणवीस, महाजन यांनी भेट दिल्याने या साखरपेरणीचे वेगवेगळे अन्वयार्थ काढण्यात येत आहेत.
#मुक्ताईनगर व #रावेर येथे जोरदार पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात मा.देवेंद्र फडणवीस यांनी #कोथळी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांविषयी कैफियत मांडून तत्काळ नुकसान भरपाई मिळणे बाबत निवेदन देऊन विनंती केली. pic.twitter.com/z9Ltm3FonK
— Raksha Khadse (@khadseraksha) June 1, 2021
फडणवीस ‘मुक्ताई’वर, खडसे मुंबईत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिली. परंतु एकनाथ खडसे हे सोमवारीच मुंबईला रवाना झाले होते.
फडणवीसांचा ताफा अडवला
मुक्ताईनगरमध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा ताफा शिवसैनिक व शेतकऱयांनी रोखला. जळगावात वादळामुळे केळी बागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या केळी पीक विम्याबाबत फडणवीस यांना यावेळी जाब विचारण्यात आला. यावेळी फडणवीसांकडूनही सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
चहापानाचे आमंत्रण होते म्हणून आलो
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेले असले तरी खासदार रक्षा खडसे या अद्याप भाजपमध्येच आहेत. त्यांनी चहापानाचे आमंत्रण दिले होते. म्हणून कोथळी येथे ‘मुक्ताई’वर आलो असे देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.





























































