
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच मराठा आरक्षणसाठी जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनास सुरूवात झाली असून बाजार गेवराई पाटीवर छत्रपती संभाजीनगर – जालना महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी चार – चार किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
बदनापूरातील सर्वच कार्यालय बंद पाडले तसेच आंदोलनकर्त्यांनी बदनापूर तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह प्रशासकीय इमारतीतील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडून प्रशासनाचा निषेध केला. सेलगाव येथे तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी राज्यभर समाजाचा प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष असून विविध मार्गांनी तो व्यक्त करण्यात येत आहे. समाजाच्या या प्रश्नी तीव्र भावना असून आरक्षणासाठी आंदोलने सुरूच आहेत. आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच आरक्षण मंजूर करावे या प्रमुख मागणीसाठी बदनापूर तालुक्यात ही तीव्र आंदोलने सुरू आहेत. ठिकठिकाणी उपोषणे, ठिय्या आंदोलने सुरू असतानाच मोबाईल टॉवर, उच्च विद्युत वाहिनी टॉवर आदींवर तरुणांनी चढून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे.
गेवराई बाजार पाटीवर सकाळी 11 वाजेपासून आंदोलनकर्त्यांनी चक्का जाम आंदोलनास सुरुवात केली. सुमारे दोन तास त्यांनी छत्रपती संभाजीनगर – जालना महामार्ग रोखून धरला. प्रशासनाने विनंती केल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आले असले तरी या आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूंनी चार – चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केल्यानंतर थेट बदनापूर तालुक्यातील प्रशासकीय इमारत असलेल्या तहसील कार्यालय परिसरात आंदोलन केले. त्यांनी या प्रशासकीय इमारतीत असलेले तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, कृषी कार्यालय, महसूल कार्यालय, निवडणूक विभाग, लँड रेकॉर्ड ऑफिससह पंचायत समिती कार्यालयावर धडक मारून सर्व कार्यालये बंद केली.
तेथून सर्व आंदोलकांनी थेट बदनापूर नगर पंचायत कार्यालय गाठून सदरील कार्यालयही बंद पाडले. बदनापूर तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद पाडून प्रशासनाचा निषेध या वेळी सकल मराठा बांधवांनी व्यक्त केला. तर तालुक्यातील सेलगाव येथेही मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन सुरूच असून या ठिकाणी मोबाईल टॉवरवर चढून मराठा आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची धग वाढत चालली असून प्रशासनने यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने करण्यात येत आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न
मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असतानाच तरुणांमध्ये ही प्रशासनाविरोधात मोठा असंतोष पहायला मिळत आहे. बदनापूर तहसील कार्यालयात आज एका तरुणाने थेट पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्याला त्या पासून परावृत्त केले. तहसील परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती होती.
























































