पिकविम्याच्या अनुदानासाठी स्वत:ला जमिनीत गाडून घेतले, तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्याचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी मंडळातील डाळिंबाच्या पिकविम्याचे अनुदान देण्यात यावे यासाठी आज तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्याने स्वतःला खड्ड्यात गाडून घेत आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. कारभारी म्हसलेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान वारंवार निवेदन देऊनही प्रशासन ताळयावर येत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

बदनापूर तालुक्यातील सर्व मंडळांना विमा कंपनीने विमा दिलेला असून दाभाडी मंडळ हे सतत 3 वर्षांपासून वगळण्यात येत आहे. आमच्या मंडळामध्ये सर्वांत जास्त डाळींब या पिकाचे प्रमाण असून शेतकऱ्यांनी डाळींब विमा भरलेला आहे. डाळींब पीक पूर्णपणे उद्धवस्त झालेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही कंपनीने विम्यापासून वगळून दाभाडी मंडळावर अन्याय केलेला आहे, असा आरोप शेतकऱ्याने केला.

विमा कंपनीने केलेला हा अन्याय दूर करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी निवेदन व अर्ज दिलेला होता. परंतु प्रशासनाने कोणतेही समर्पक उत्तर मिळाले नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दाभाडी येथील कारभारी म्हसलेकर या शेतकऱ्याने स्वत:ला जमिनीत गाडुन आंदोलन केले आहे. या वेळी दाभाडी मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.