जालन्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा ताफा अडवला

आरक्षणाबाबत मराठा समाज आक्रमक भूमिका घेत असल्याने आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथे मराठा समाजाने गावातील विकास कामांच्या भूमिपूजन करण्यासाठी जात असताना ‘जो समाजाला मानत नाही, समाज त्याला मानत नाही’, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी गावबंदीची आक्रमक भूमिका घेतल्याने आमदार बबनराव लोणीकर यांना घटनास्थळावरून आज 23 फेब्रुवारी रोजी पळ काढावा लागला.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी लढा उभारला असून, या लढ्याला टकले पोखरी येथील मराठा समाजाने ताकदीनिशी एकजुटीने पाठिंबा दिला आहे. जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदार-खासदार व मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते, कार्यकर्ते अडचणीत आले असून, गावात लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत.

आरक्षणविरोधी पुढार्‍यांना गावात प्रवेश करण्यास, तसेच नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षाला सभा घेण्यास बंदी घातली आहे. आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाज आता आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या लढ्याची झळ आमदार, खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनाही बसत आहे. लोकप्रतिनिधींची अधिकच कोंडी होणार आहे.