जालन्यातील परतूरात फटाक्यांवरून झालेल्या वादातून तरुणांवर तलवारीने हल्ला; दोन जण गंभीर जखमी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील परतूर शहरात उत्साहाचे वातावरण असताना शहरातील मोंढा भागातील फटाके मार्केटमध्ये फटाके घेताना झालेल्या वादातून तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रशांत कदम आणि त्याच्या साथीदारांसह सात ते आठ जणांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परतूर येथे सोमवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी रामेश्वर उबाळे रा. परतूर हा मोंढा भागातही फटाके मार्केटमध्ये फटाके घेण्या करिता ओंकार लिंबाजी माने यांच्या दुकानात फटाके खरेदीसाठी गेले होता. त्याचवेळी याठिकाणी प्रशांत कदम हा सुमारे सात-आठ साथीदारांसह, हातात तलवार, चाकू व लोखंडी रॉड घेऊन दुकानात आला. प्रशांत कदम यांनी दुकानदार ओंकार माने यांना “तु आम्हाला फटाके उधार का देत नाहीस?” असे म्हणत शिवीगाळ करून तलवारीने हल्ला केला. ओंकार माने यांनी तो वार चुकवला, मात्र तलवार दुकानाच्या पेंडॉलच्या लोखंडी पाईपला लागली.

यानंतर ओंकार माने याचा भाऊ सारंग माने यांनी भांडण थांबवण्यासाठी पुढे गेल्यावर प्रशांत कदम यांनी त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान,फिर्यादी भांडणे सोडविण्यासाठी गेल्यावर विशाल शिंदे यांनी त्याच्या डोक्यावर तलवारीने वार केला. यावेळी आदेश पवार यांनी डाव्या हातावर लोखंडी रॉडने प्रहार करून हात फ्रॅक्चर केला. विकास मोरे यांनीही उजव्या हातावर रॉडने वार केला.

त्यानंतर प्रशांत कदम, आदेश पवार, विकास मोरे, आकाश सुपेकर, संस्कार भालेराव व आणखी ३–४ इसमांनी मला व सारंग माने याला जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. आदेश पवार यांनी सारंग माने यांच्या हातावर चाकूने वार केला. या दरम्यान आरोपींनी “आम्ही परतूरचे डॉन आहोत; आमच्याकडून पैसे मागाल तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली.