
जालना जिल्ह्यातील अंबड येथील मराठवाड्याचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री मत्स्योदरी देवी मंदिरामध्ये चोरी झाली आहे. चोरांनी मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली दोनपेटी कटरच्या सहाय्याने फोडली आणि अंदाजे 5 लाख रुपयांचे मुद्देमाल लंपास केला, अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पोलिसांना दिली आहे.
गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी श्री मत्स्योदरी देवी मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात असलेली दानपेटी कटरच्या मदतीने फोडली आणि त्यातील रक्कम पळवली. ही घटना शुक्रवारी सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी गाभाऱ्यात गेल्यानंतर उघडकीस आली. यानंतर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक तुषार दोषी, पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक योगेश चव्हान, आदिनाथ ढाकणे यांच्या सह श्वान पथक तसेच ठसे तंज्ञ यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलीस तपासावेळी मत्स्योदरी देवीच्या मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रित कारणांमुळे बंद पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गाभाऱ्यात शिरलेल्या चोरट्यांची ओळख पटण्यास अडचण येत आहे.
‘श्री मत्स्योदरी देवी मंदिरात चोरी झाल्याचे मंदिराचे पुजारी गीता विलास कुठेफळकर यांनी मला माहिती दिली. मला माहिती मिळताच मी पोलिसांना कळविले. मंदिराची तिजोरी प्रत्येक सहा महिन्यांनी खोलली जाते. या तिजोरीत अंदाजे 6 लाखांच्या आसपास रक्कम जमा होती. पुढील महिन्यात दानपेट्या खोलणार होतो, अशी माहिती श्री मत्स्योदरी देवी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.


























































