जालना जिल्ह्यातील धामणा पाठोपाठ पद्मावती धरणही ओव्हरफ्लो

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारधपासून जवळच असलेले शेलुद येथील धामणा धरण पाठोपाठ पद्मावती धरण काल सायंकाळी 100 टक्के भरले असून परिसरातील 25 ते 30 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

यावर्षी पावसाने सुरवातीस थोडा विलंब केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी निर्माण झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली असून मागील आठवड्यात भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरण ओव्हरफ्लो झाले आणि लेहा, शेलुद, वडोद तांगडा, जळगाव सपकाळ, हिसोडा यांच्यासह अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.

काल 13 सप्टेंबर रोजी धामणा पाठोपाठ पद्मावती धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पारधसह परिसरातील वालसावगी, पारध खुर्द, पद्मावती, वाढोणा, विझोरा तर बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ, तरारखेड, गुम्मी, धामणगाव, मढ, पाडळी देऊळघाट आदी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून दमदार पावसाने नदी नाले खळखळ वाहत आहे.

शेतातील विहीरीही वरून वाहत आहे असे असले तरी ‘कही गम कही खुशी’याप्रमाणे गेल्या दोन आठवड्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसाने पिकावर याचा परिणाम होत असून सोयाबीन सडण्यास सुरवात झाली, उडीद, मूग, तीळ हे पिके हातची गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या