
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुसून बसलेल्या वरुणराजा पुन्हा सक्रिय झाला असून काल 13 जुलै पासून कधी रिमझिम तर कधी जोरदार सरी कोसळत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. तर अनेक ठिकाणी नद्या व नाल्यांना पूर आले आहेत. जिल्ह्यातील अंबड- घनसावंगी रोडवर बांधण्यात आलेला तात्पुरता पूल पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे.
जिल्ह्यातील जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर तालुक्यात काल रात्री पासून पाऊस सुरू आहे तो अद्याप चालूच आहे. परतूर येथील लेंडी नाल्याना पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद होती.
अंबड ते घनसावंगी मार्गावर बोधलापुरीच्या नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने वाहनांसाठी बनवलेला वळणरस्ता मुसळधार पावसात रात्री वाहून गेला.

























































