
हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी दिग्दर्शित अवतार – द वे ऑफ वॉटर हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला. त्याने लोकप्रियतेचे आणि कमाईचे बरेच विक्रम मोडले. आता याच दिग्दर्शकाचा एक जगप्रसिद्ध चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
कॅमेरून यांनी दिग्दर्शित केलेला टायटॅनिक हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. लिओनार्डो डीकॅप्रिओ आणि केट विंस्लेट यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या टायटॅनिकने तब्बल 14 ऑस्कर जिंकले होते.
चित्रपटाची 25 वर्षं आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 10 फेब्रुवारीपासून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचं जेम्स कॅमेरून यांनी स्पष्ट केलं आहे. 19 डिसेंबर 1997 मध्ये ‘टायटॅनिक’ प्रदर्शित झाला होता. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, बेंगळुरू या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये हा चित्रपट पुन्हा दाखवला जाणार आहे.
शोकांतिका असलेली ही प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. आता पुन्हा हा चित्रपट नव्या रूपात थ्रीडी मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही मोजक्याच चित्रपटगृहात हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.