जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाला दोन महिन्यातच तडे; गटारेही खचली

जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पक्का रस्ता तयार झाला आहे. डांबरी रस्ता योग्य प्रमाणात खणण्यात आला नसल्याने वाहनचालकांना करसत करावी लागत आहे. काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर मुरूम टाकून त्यावरचकच्चा थर व नंतर पक्का थर टाकला. त्यामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी तडे पडत आहेत. तसेच गटारेही काही ठिकाणी खचले आहेत. दोन महिन्यातच ठेकेदाराचे निकृष्ट काम दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी काम घेतले आहे. दीड वर्षापूर्वीच काम सुरू झाले असले तरी ते संथ गतीने सुरू आहे. शहरातील जनता धुळ, निसरडे आणि अरूंद रस्ते यामुळे त्रस्त आहे. खडी रस्त्यावर पसरल्याने अपघाताचा धोका आहे. अद्याप काम पूर्ण झाले नसतानाच रस्त्याला तडे गेले आहेत तसेच गटारेही खचली आहेत.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी केले आहे. गेल्या दीड वर्षभरापासून काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून त्यावर मातीमिश्रीत मुरूम टाकला आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. तसेच धूळ आणि पसरलेल्या खडीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एक तर निकृष्ट दर्जाचे काम यातही कमी जाडीचा स्लॅब यावरून अनेक ठिकाणी जाण्यायेण्यासाठी रस्ता आहे. भविष्यात कधीही हा गटारावरील स्लॅब खचून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी वर्गाने ताबडतोब ज्या ठिकाणी कमी जाडीचा स्लॅब असेल तो काढून त्या जागी नियमानुसार असलेल्या जाडीचा स्लॅब टाकावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.