
जवानांनी जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील दुर्गम गावात राहणाऱया दिव्यांग मुलाला व्हिलचेअर देऊन आणि त्याच्या मासिक पेन्शनची व्यवस्था करून मन जिंकलं आहे. याबद्दल जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सैन्यदलाच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, मुघल मैदानाच्या शिरी गावात नऊ वर्षांचा वारीस हुसैन वाणी राहतो. त्याला चालता येत नाही. कडाक्याच्या थंडीत तर त्याची अवस्था फारच बिकट होती. बर्फामध्ये त्याला एक पाऊलही टाकता येत नव्हते. जानेवारी महिन्यात गस्तीवर असणाऱया जवानांनी त्याची अवस्था बघितली होती. जवानांनी त्याला सुरक्षितरीत्या घरी पोचवले. वारिसचे वडील मोलमजुरी करून वारीसला शिकवतात. याविषयी लष्कराचे जम्मू विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, जवानांनी दिव्यांग वारीसची मदत केल्यानंतर त्याच्या परिस्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती दिली. त्यानंतर वारीसला व्हिलचेअर आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने एक हजार रुपयांचे मासिक पेन्शन सुरू करण्यात आले. पायाचा त्रास असूनही वारीसची हिंमत आणि इच्छाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. अन्य मुलांप्रमाणे तो शाळेत जातो, अभ्यास करतो. शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसूनही स्वतःची कामे स्वतःच करतो. त्याला मोठे झाल्यावर शिक्षक बनायचे आहे.
























































