
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जमिनीवरून हल्ला करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने आता हवेतून हल्ला करण्याचा कट रचल्याचा संशय आहे. जम्मूच्या सीमावर्ती गावांमध्ये गुरुवारी रात्री एकाचवेळी तीन ठिकाणी पाकिस्तानचे तीन संशयास्पद ड्रोन्स घिरटय़ा घालताना आढळले. सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) जवानांनी गोळीबार करून या ड्रोन्सना पिटाळले.
सांबा जिह्यातील गावांमध्ये हे ड्रोन्स घिरटय़ा घालताना आढळले. सांबाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश शर्मा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. संशयास्पद ड्रोन्सने बारी ब्राम्हणा, चिलाद्या आणि घगवालमध्ये जम्मू-पठाणकोट महामार्गावरील संवेदनशील सुरक्षा तळांच्या आवारात घिरटय़ा घातल्या. दोन ड्रोन्स लष्करी छावणीजवळ तर एक ड्रोन आयटीबीपीच्या छावणीजवळ संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. दुसरीकडे, मावामध्येही पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली होती.

























































