हिंदुस्थानी सैनिकांवरील भ्याड हल्ल्याचा बदला घेतला, शोपियांमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी पूंछ जिह्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत हिंदुस्थानचे पाच जवान शहीद झाले होते. आता हिंदुस्थानी सैन्यांनी याला चोख प्रत्युत्तर देत बदला घेतला आहे. आज शोपियानमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख गंदरबल येथील मुख्तार शाह अशी झाली आहे.

दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त

शोपियान चकमकीत ठार झालेले हे तीन दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले आहे. सध्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळ्यासह आपत्तीजनक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, पूंछ जिह्यातील सुरणकोटच्या डेरा की गली भागात सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळताच रविवारी मध्यरात्रीपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यात पाच जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांनमध्ये नायब सुभेदार जसविंदर सिंग, नायक मनदीप सिंग, गज्जन सिंग, सरज सिंग, जवान वैशाख यांचा समावेश आहे.