जामसांडे येथे वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामसांडे भटवाडी येथील मोहन सुभाष जाधव (68) व त्यांची पत्नी मनीषा मोहन जाधव (62) यांनी विष प्राशन करून आपले जीवन संपविले. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची फिर्याद त्यांची सून प्रणिता सदगुरू जाधव (32) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन जाधव व मनीषा जाधव हे वृद्ध दाम्पत्य हे सून प्रणिता हिच्यासोबत जामसांडे गावातील भटवाडीत राहत होते. मोहन जाधव यांचा मुलगा सदगुरू जाधव हा नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतो. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सून प्रणिता जाधव ही घराच्या बाहेरील पटांगणामध्ये मोबाईलवर बोलत होती. अचानक घरामध्ये उलट्यांचा आवाज ऐकू आल्याने ती घरात गेली असता तिला सासू सासरे उलट्या करीत असल्याचे दिसले. यावर तिने काय झाले असे विचारले असता आपण आपण विष प्राशन केल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर प्रणिता हिने तत्काळ शेजार्‍यांना बोलावून सासू- सासरे यांना देवगड ग्रामीण रुiणालयात तात्काळ दाखल केले. या दोघांवर उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी 6 वाजता मोहन जाधव व सकाळी 10 वाजता मनीषा जाधव यांचे निधन झाले. आपले सासू- सासरे हे हृदयविकाराने त्रस्त होते, असा जबाब सून प्रणिता यांनी देवगड पोलीस स्थानकात दिला आहे. अधिक तपास देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शैलेंद्र कांबळे करीत आहेत.