वादळी पावसामुळे जंजिरा किल्ल्याची दारे पुन्हा बंद

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुरुड परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने प्रशासनाने जंजिरा किल्ल्याची दारे बंद केली आहेत. त्यामुळे हजारो पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला. दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने पर्यटक मुरुड परिसरात आले आहेत. विकेण्डमुळे हजारो पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, किल्ला बंद करण्याच्या निर्णयामुळे पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या बोट व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.

मुंबईपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात या क्षेत्राचे रूपांतर तीन दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अरबी समुद्राबरोबर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहेत. मुरुडला पावसाने झोडपून काढले आहे. परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यामुळे प्रशासनाने जंजिरा किल्ला बंद केला. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी किनाऱ्यावर आलेल्या हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला.

हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल

मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदर, राजपुरी बंदर, दिघी बंदर या ठिकाणाहून जलवाहतूक सुरू असते. दिवाळी सणात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती. मुरुडमधील सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाल्याने काही पर्यटकांनी पार्किंग लॉटच्या ठिकाणी रात्र काढली. अवकाळी पावसामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले.