IND vs ENG Test – बुमराचे पुनरागमन अन् बाकावरील खेळाडूंना संधी

अखेरच्या औपचारिक कसोटीत टीम इंडियात बदल अपेक्षित

हिंदुस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा 7 मार्चपासून धर्मशाळा येथे सुरू होणाऱया इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या औपचारिक कसोटी क्रिकेट सामन्यात पुनरागमन करू शकतो. याचबरोबर मालिका आधीच 3-1 फरकाने खिशात घातल्यामुळे बाकावरील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचाही हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन विचार करू शकते.

मंगळवारी हिंदुस्थानी संघातील सर्व खेळाडू रांचीहून रवाना झाले आहेत. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 2 मार्चपर्यंत चंदिगडमध्ये एकत्र येण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुमराहही चंदिगडमध्येच संघात सामील होणार आहे. यानंतर संपूर्ण टीम चार्टर्ड फ्लाइटने 3 मार्चला धर्मशाळा येथे जाणार आहे.

वर्कलोडमुळे जसप्रीत बुमरा रांचीतील चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे बुमराहच्या जागी आकाश दीपने पदार्पण केले होते. पदार्पणाच्या कसोटीत त्याने 3 बळी टिपले. त्यामुळे पाचव्या कसोटीत बुमराहला खेळविणार की नाही हे बघावे लागेल. बाकावरील खेळाडूंना संधी देण्यासाठी एक फलंदाज व एक गोलंदाज बदलण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा घेऊ शकतो. यात फॉर्ममध्ये असेला यशस्वी जैस्वाल किंवा फॉर्ममध्ये नसलेला रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसवावे लागेल. लोकेश राहुलचेही धर्मशाळा कसोटीत खेळणे संदिग्ध आहे. कारण हैदराबाद कसोटीपासून संघाबाहेर असलेला राहुल दुखापतीवर उपचारासाठी इंग्लंडला गेला आहे.