सध्या महाराष्ट्रद्रोहींचा काळ सुरू आहे! जयंत पाटील यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रद्रोहींचा काळ सुरू असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे काम हाती घेतले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाकडून महापुरुषांच्या सातत्याने होणाऱया बदनामीवर त्यांनी यावेळी भाष्य केले. आपले महापुरुष हे आपले भूषण आहे. आपला गौरव आहेत. मात्र त्यांचा अपमान केला जात आहे. त्यांना कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

दिलगिरीचे पत्र पाठवायला राज्यपालांना दोन महिने का लागले?
महापुरुषांची बदनामी केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले. पत्र लिहायला त्यांना इतका वेळ का लागला? जाण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पत्र लिहिताय ? असा सवालही जयंत पाटील यांनी यावेळी केला. तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात जे काम केले आहे, महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यपालांना स्वीकारत नाही असे समोर आले आहे, असेही ते म्हणाले.