
सामना प्रतिनिधी । बीड
बीड जिल्ह्यातील तब्बल 30 हजार शेतकऱ्यांची नावे सोयाबीनच्या पिकविम्याच्या यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर उभे राहिले आहे. त्यांनी पिकविमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना सोमवारी बोलावले होते. या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वडवणी, धारूरसह जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे रितसर तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन क्षीरसागर यांनी केले आहे. त्यामुळे पिकविम्यापासून वंचित 30 हजार शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.
बीड जिह्यातील गतवर्षीच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना उर्वरित पिकाचा विमा मिळाला. मात्र, सोयाबिनच्या पिकविम्यामध्ये बीड जिल्ह्यातील 25 ते 30 हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या प्रकरणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन अन्याय झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्याची दखल घेत क्षीरसागर यांनी पिकविमा प्रश्नात जातीने लक्ष घातले. पिकविमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी फैलावर घेतले. पिकविमा कंपनीकडे कोणत्याही याद्या नाहीत. कोणती माहिती नाही, कंपनीचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होती. पीक विमा कंपनीचा भोंगळ कारभार बघून क्षीरसागर संतापले. कोणत्याही परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. सोयाबीन पिकाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असे आदेश त्यांनी दिले.
शेतकऱ्यांसाठी तालुका पातळीवर ज्या समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्या समितीने संबंधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचे परिक्षण करून, तपासण्या करून तातडीने पिकविमा कंपन्यांना कळवावे असेही आदेश त्यांनी दिले. वडवणी, धारूर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन पिकविम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीकडे तातडीने रितसर तक्रार दाखल करावी, असे आवाहनही क्षीरसागर यांनी केले. तसेच बीड जिल्ह्यामध्ये फळबाग नुकसानीच्या विम्याची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा असेही म्हटले आहे. या प्रकरणी आपण कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.






























































