राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांना मालवण दिवाणी न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दोघांना कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. आरोपींचे वकील आणि सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश महेश देवकते यांनी आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली.
आपटे हा 26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यापासून फरार होता. त्याच्याविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. पोलिसांची सात पथके त्याचा शोध घेत होती. अखेर बुधवारी रात्री कल्याणच्या घरातून त्याला अटक केली आणि गुरुवारी सकाळी मालवण पोलीस ठाण्यात आणून सिंधुदुर्ग पोलिसांकडे ताबा देण्यात आला.
म्हणे नैसर्गिक घटना!
अवघ्या सात महिन्यांत पुतळा कोसळल्याने पुतळा उभारणीतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला. मात्र गुरुवारी जयदीप आपटेचा बचाव करताना त्याच्या वकिलांनी निसर्गावर खापर फोडले. पुतळा कोसळणे ही नैसर्गिक घटना आहे. राजकोटवरील पुतळा पोकळ होता. यापूर्वी अमेरिकेत राष्ट्रपतींचा पुतळा कोसळला होता. उज्जैनलाही अशीच घटना घडली होती. मग केवळ जयदीप आपटेवरच थेट गुन्हा कसा दाखल केला? एफआयआर घाईत दाखल केला आहे, असा युक्तिवाद आपटेच्या वकिलांनी केला.