अध्यात्माची, धर्माची जबाबदारी पार पाडताना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयराज साळगावकर

अध्यात्माचा आधार घेणं हे चांगलं, पण ते योग्य पद्धतीने व्हायला हवं आणि साधकांनीही ते योग्य रीत्या स्वीकारायला हवं, अमलात आणायला हवं. अध्यात्माचा हा मार्ग सोपा आहे. या अध्यात्माला त्याच शूचितेने पाहिलं, आचरणात आणलं तर आपण योग्य मार्गावरच राहू. म्हणूनच

‘हे नाम सोपा रे रामकृष्ण गोविंद’ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.

नानासाहेब धर्माधिकारी यांचा “श्री परिवार’’ महाराष्ट्रात सगळ्यांच्या परिचयाचा. श्री परिवाराचे संस्थापक नानासाहेब धर्माधिकारी यांचे आठवे पूर्वज यांना धर्माधिकारी हा किताब सरखेल कान्होजी आंग्रे यांनी दिला. यावरून त्यांच्या परंपरेचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. समाजासाठी चांगल्या गोष्टी करणाऱ्या संस्थेचा महाराष्ट्रात चांगला लौकिक आहे. ‘दासबोध’ या श्री समर्थांनी लिहिलेल्या ग्रंथाचे निरूपण श्री परिवाराच्या बैठकीच्या माध्यमातून केले जाते. यासोबत अनेक समाजोपयोगी कामांची धुराही या परिवाराद्वारे सांभाळली जाते. सध्याच्या मानसिक ताणतणाव जाणवणाऱ्या काळात आपलं जगणं सोपं होण्यासाठी अध्यात्माचा आधार कसा घ्यावा हेच ते सांगतात. यामुळे वाईट मार्गाला वळलेल्या, व्यसनांचा मार्ग निवडलेल्या अनेकांचे आयुष्य, संसार सावरले आहेत. विविध सकारात्मक मार्गांनी समाजाला दिशा देण्याचं, सुधारणेचं काम या माध्यमातून संस्थेकडून होत आहे. यात समर्थांच्या भक्तीचा, दासबोधाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे हे विशेष.

श्री परिवाराचे वैशिष्टय़ म्हणजे एवढय़ा मोठ्या संख्येत असणारे भक्तगण. या भक्तांच्या नियोजनात पूर्वीच सातत्य राहिले आहे का? हा प्रश्न आता उद्भवतोच. कारण खारघर येथे घडलेली दुर्घटना त्यांनी आतापर्यत केलेल्या कामाला गालबोट लागण्यासारखी आहे. म्हणूनच या कामात पूर्वीसारखे पावित्र्य राहिले आहे का? हा मुद्दा आहे. सध्याच्या वेगवान जगात मानसिक आधाराची गरज भासते. ही गरज अध्यात्माच्या माध्यमातून पूर्ण होत असेल तर लोकांना ते हवे असते. अनेक लोक त्या त्या पंथाचे, विचारांचे अनुयायी होतात. अशा अनुयायांसोबतच बाजारबुणगेही येतात आणि त्यांच्यामुळे पंथाच्या कामाला गालबोट लागते. हाच प्रकार कदाचित खारघर दुर्घटनेबाबत घडला असावा.

श्री परिवाराचा लौकिक मोठा असताना अशी घटना घडायला नको होती असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र संस्था मोठी होऊ लागली की, लोकांच्या अपेक्षाही वाढत जातात. धर्मगुरूंचे अनुयायी वाढले की, संस्थेचा आवाका मोठा होतो आणि संस्थेची काही सूत्रं इतरांकडे आपोआप सोपवली जातात. त्यातून पिळवणूक, नियोजनाचा अभाव या गोष्टी घडतात. कुणातरी एकाकडे अधिकाराची सूत्रे सोपवली जातात आणि कुणातरी एकाला वाटले म्हणून अचानक अनपेक्षित निर्णय घेतले जातात. म्हणूनच आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी ‘गृहमंत्र्यांना’ बोलवावंसं का वाटलं, हा यातला कळीचा मुद्दा ठरतो. ‘महाराष्ट्र भूषण’ हा उच्च पुरस्कार देण्यासाठी असा निर्णय घेतला गेला असावा असा कयास जरी मांडला तरी या कार्यक्रमासाठी केंद्रातील मंत्री येणार म्हणून उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली असणार. मग श्री परिवारातील सदस्यांना इतक्या संख्येत बोलावलं गेलं त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्रातील सरकारने घेणं अपेक्षित होतं. मात्र दुर्दैवाने सुरक्षेबाबतचे योग्य नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे 14 जणांचा जीव जाण्याचा अनर्थ घडला. भर दुपारी इतक्या संख्येत लोकांना बोलावलं गेलं. त्यांच्यासाठी सावलीची व्यवस्था करणे आवश्यक होते. इतक्या लोकांचा बळी उन्हामुळे, गर्दीमुळे, तहानेने व्याकूळ झाल्याने, घुसमट झाल्याने गेला आहे. यात 14 जणांचे बळी असे म्हटले जात असले तरी नक्की संख्या माहीत नाही. शिवाय यामुळे अनेकांना आता आणि भविष्यात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना जरी मुद्दाम घडवून आणली नसली तरी याबाबत महाराष्ट्र सरकार आणि आप्पासाहेब धर्माधिकारी परिवार यासाठी तितकेच जबाबदार आहेत. यात ढिसाळ नियोजन, हलगर्जीपणा असे अनेक मुद्दे आपल्याला दिसत आहेत. मात्र अद्यापही याबाबत कोणतीच ठोस हालचाल वा चौकशी सुरू झालेली नाही हे खेदजनक आहे. सरकारने याबाबत योग्य सुव्यवस्था केली होती असं सरकारचं म्हणणं आहे. यात हवामान खात्याचा अंदाज दर पंधरा-वीस मीटरवर पाण्याची व्यवस्था हे सगळं केलं होतं का, का नाही तर याचं उत्तर बहुदा नाहीच. तेव्हा जे घडलं त्याची योग्य चौकशी होणे अधिक गरजेचे आहे.

जो अनर्थ घडला त्यासाठी सरसकट आध्यात्मिक संस्था वा परिवार किंवा धर्माला, समजुतांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. धर्माच्या नावाने चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले जाऊ नये. ‘दासबोध’ वाचताना, आत्मसात करताना अनेक बाबींचे आकलन आपल्याला होते. समर्थांनी ‘दासबोधा’त नाहीच. तेव्हा जे घडलं त्याची योग्य चौकशी होणे अधिक गरजेचे आहे.  जो अनर्थ घडला त्यासाठी सरसकट आध्यात्मिक संस्था वा परिवार किंवा धर्माला, समजुतांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

अशा घटना घडल्या की सुधारकी समाजाला प्रश्न पडतो, समाज इतका प्रगत होत असताना, शिक्षणाने, विचारांनी पुढे जात असतानाही विवेकबुद्धी हरवून अविवेकी धर्मगुरूंना वा अशाच कोणत्याही विचारांना का बळी पडत आहे? का कुणीतरी सांगितले म्हणून कोणताही विचार न करता त्यांच्या आज्ञेचे पालन करीत आहे? याचं उत्तर बहिणाबाईंच्या एका ओवीत आहे ती म्हणजे ‘मन वढाय वढाय…’ माणसाचं मन ताब्यात ठेवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कधीतरी त्याच्यातील मोह, लोभ, द्वेष, व्यसन अशा प्रवृत्ती डोकं वर काढतात आणि त्याच्याकडून दुराचरण होतं. कौटुंबिक कलह वाढतात. अनेक समस्या उद्भवतात. त्यातून येणारं नैराश्य, मानसिक त्रास, व्यसन यावर उपाय शोधता शोधता कुणाला धर्मगुरू, कुणाला प्रवचनकार तर कुणाला निरूपणकार सापडतात. इथे प्रत्येक जण स्वत:च्या समस्या सोबत घेउढन येतो आणि त्यातून मुक्तता मिळावी यासाठी धर्मगुरू सांगेल ते उपाय, उपचार आचरणात आणतो. यात चूक कोणाची? यातला दोन्हीकडचा हेतू शुद्ध असेल तर येणाऱ्या भक्ताचं, शिष्याचं भलं होणार असतं. धर्मगुरूंचं प्रयोजनच मुळी त्यासाठी असायला हवं, पण दुर्दैवाने सगळीकडेच तसं असतं असं नाही. अध्यात्माचा आधार घेणं केव्हाही चांगलं, पण ते योग्य पद्धतीने व्हायला हवं आणि साधकांनीही ते योग्य रीत्या स्वीकारायला हवं, अमलात आणायला हवं. अध्यात्माचा हा मार्ग सोपा आहे. या अध्यात्माला त्याच शूचितेने पाहिलं, आचरणात आणलं तर आपण योग्य मार्गावरच राहू. म्हणूनच ‘हे नाम सोपा रे रामकृष्ण गोविंद’ हे ज्ञानेश्वर माउढली म्हणतात ते अगदी खरं आहे. समर्थांच्या ‘दासबोधा’ने लोकांचे पुनर्वसन केले, जसा लोकांना मार्ग दाखवला, तसाच मार्ग ‘ज्ञानेश्वरी’नेही आपल्याला दाखवला आहे. आध्यात्मिक संस्था वा उपक्रम चालवणाऱ्या लोकांचा उद्देश पारदर्शक आणि चांगला असेल तर त्याचा लाभ लोकांना होतो. मात्र या उपकमांना जेव्हा भव्य दर्शविण्याचा, भासवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा प्रयत्न फसू शकतो.

खारघर दुर्घटनेबाबत या गोष्टी आढळून येतात हे खरं, पण ते पाहण्यापेक्षा कार्यक्रम स्थळावरील ढिसाळ नियोजनाबद्दल शासनाने भाष्य करणं जास्त उचित ठरेल. या प्रकरणाची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे. शासकीय कार्यक्रम म्हटल्यानंतर याबाबतची पूर्ण जबाबदारी शासनाची असली पाहिजे आणि झालेल्या दुर्घटनेबद्दल शासन उत्तर देण्यास बांधील आहे. जी संस्था मागील आठ पिढय़ांपासून समाजासाठी काम करत आहे, अध्यात्मासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं, त्यांना अशा घटनेमुळे थेट गुन्हेगार ठरवणं थोडं धाडसाचं म्हणायला हवं. आध्यात्मिक संस्थांकडून हयगय होणं ही गोष्ट निषेधार्हच मानायला हवी. मात्र आप्पासाहेब धर्माधिकारींच्या संस्थेबाबत अशा गोष्टी पुराव्यासहीत समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे या घटनेनंतर त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? हा प्रश्न आहे.

अध्यात्म हा आपल्या धर्माचा पाया आहे. धर्माचं महत्त्व कमी होऊ नये, धर्माबाबत चुकीच्या गोष्टी घडू नयेत याची जबाबदारी अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला सुधारण्याचे काम करणाऱ्या संस्थांनी पाळायला हवी. समाजाला एकसंध राखण्यात धर्म महत्त्वाची भूमिका बजावतो म्हणूनच धर्माची सहिष्णू ही ओळख कायम राहावी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. समाजाला बुद्धिवादी बनवण्यासाठी अध्यात्म आणि धर्म यांची योग्य सांगड घातल्यास तो समाज अधिक प्रगत आणि सुसंस्कृत होतो. अशा समाजाचे दायित्व आपण स्वीकारले पाहिजे. सध्या धर्माच्या नावाने भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. तो थांबवण्यासाठी योग्य नियमनाची गरज आहे. शासन आणि धर्मसंस्था, आध्यात्मिक संस्था यांच्या योग्य एकत्रित कार्यवाहीनेच याबाबतच्या चुकीच्या गोष्टी थांबतील. कारण अॅब्सल्यूट पॉवर करप्ट अॅब्सल्युटली याचा अर्थ कोणतीही शक्ती पूर्णपणे आणि अतिरेकाने कोणाजवळ आली तर ती अतिघातकी असे काहीही घडवून आणू शकते. म्हणूनच घडणारा भ्रष्टाचारही तितकाच परिपूर्ण ठरू शकतो, ताकदवान असू असतो. अशा शक्तींना शह देणे ही आपली एक नागरीक म्हणून जबाबदारी आहे.

शब्दांकन : शुभांगी बागडे

(लेखक प्रकाशन व्यवसायात कार्यरत असून विविध क्षेत्रांचे गाढे अभ्यासक आहेत.)