
आयआयटी मुंबईने ‘जेईई अॅडव्हान्स्ड 2022’ परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. या निकालात आयआयटी मुंबई झोनचा आर. के. शिशिर हा देशात पहिला आला. त्याने 360 पैकी 314 गुण मिळवले. आयआयटी दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही 277 गुण मिळवून देशात मुलींमधून पहिली आली. टॉपर्समध्ये ती 16 व्या क्रमांकावर आहे. मुंबई झोनमधील 29 विद्यार्थ्यांनी ‘टॉप 100’मध्ये स्थान मिळवले आहे.
‘जेईई अॅडव्हान्स्ड 2022’ ही परीक्षा यंदा आयआयटी मुंबईने घेतली होती. यावर्षी दोन्ही पेपरसाठी एकूण 1 लाख 60 हजार 38 उमेदवारांनी नोंदणी केली असून 1 लाख 55 हजार 538 उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 40 हजार 712 उमेदवार पात्र ठरले आहेत. परीक्षेचा निकाल जेईई-अॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. आयआयटी दिल्ली झोनमधील 22, आयआयटी रुरकी झोनमधील 11, आयआयटी भुवनेश्वरमधील 6, आयआयटी गुवाहाटीमधील 2 तर आयआयटी कानपूर झोनमधील एका विद्यार्थ्याने ‘टॉप 100’मध्ये बाजी मारली.
आर. के. शिशिर हा मूळचा कर्नाटकचा असून त्याने जेईई अॅडव्हान्स्डबरोबरच ‘केसीईटी 2022’ ही परीक्षाही दिली होती. त्या परीक्षेत त्याने फार्मसी विषयात देशात पहिला तर इंजिनीयरिंगमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. तो नारायण ई-स्कूलचा विद्यार्थी आहे.
टक्केवारी घसरली
जेईई-अॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा गेल्या वर्षीपेक्षा घसरली आहे. गेल्यावर्षी ती 29.54 टक्के होती. यंदा कमी होऊन 26.17 टक्के राहिली. यावर्षी परीक्षेचे पेपर कठीण असल्याने त्याचा परिणाम टक्केवारीवर झाल्याचे सांगण्यात येते.


























































